जयपूर- आपल्या मुलांचा धुमधड्याकात लग्न लावून द्यावं, असं प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. पण मुलीने आईचं लग्न लावून दिल्याचं तुम्ही क्वचितच पाहिलं किंवा ऐकलं असेल. राजस्थानमध्ये घडलेली अशीच एक घटना समोर आली आहे. मुलीने कुटुंब व समाजाच्या पर्वा न करता आईचं दुसरं लग्न लावून दिलं. राजस्थानमध्ये दुसरा विवाहाला योग्य मानलं जात नाही, पण विरोधाला झुगारत मुलीने हे काम करून दाखवलं. मीडिया रिपोर्टनुसार, शाळेत शिक्षिका असणाऱ्या गीता अग्रवाल यांचा पती मुकेश गुप्ता यांचं मे 2016मध्ये निधन झालं. गीता यांची मुलगी संहिता नोकरीसाठी गुडगावमध्ये . संहिता हिला दोन बहिणी आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं असून वडिलांच्या निधनानंतर संहिता आईजवळ राहत होती. पण 2017मध्ये संहिता गुडगावमध्ये गेल्यावर गीता घरी एकट्या पडल्या. पती मुकेश यांच्या निधनानंतर गीता डिप्रेशनमध्ये गेल्या. संहिता गुडगावला गेल्याने गीता यांची तब्येत जास्त खराब होऊ लागली. त्यानंतर संहिताने आईचं दुसरं लग्न करण्याचा विचार केला. 'संहिताने सांगितलं की, मी आईला सोडून बाहेर गेल्याचं मला नेहमी दुःख व्हायचं. विकेण्डला मी आईला भेटायला घरी जायचे. किमान दोन दिवस तरी तिला देता यावे, या विचाराने मी घरी जायचे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मी आईसाठी दुसरा साथीदार शोधायचा निर्णय घेतला. आईच्या परवानगीशिवाय मी मेट्रीमोनिअल साइटवर आईची प्रोफाइल तयार करून माझा मोबाइल नंबर तेथे दिला. सप्टेंबर महिन्यात याची माहिती आईला दिली.
गीता यांचं कुटुंबीय पुर्नविवाहाच्या विरोधात असल्याने संहिताचा निर्णय ऐकून त्यांना काय उत्तर द्यावं? ते सुचत नव्हतं. आमच्या रूढीवादी परिवारात पुर्नविवाह अपमानजनक मानला जातो. घरातील कुणीही संहिताच्या निर्णयाचं समर्थन केलं नाही. पण संहिता निर्णयावर ठाम होती. ऑक्टोबर 2017मध्ये 55 वर्षीय कृष्ण गोपाल गुप्ता यांनी संहिताला फोन केला. गुप्ता हे बांसवारामध्ये महसून निरीक्षक आहेत. त्यांच्या पत्नीचं 2010मध्ये कर्करोगाने निधन झालं. त्यांना दोन मुलं आहेत. पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी स्वतःला बॅडमिंटन खेळात झोकून दिलं. पण वाढत्या वयानुसार फिटनेसची समस्या समोर येऊ लागली. मित्रांनी त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी मेट्रीमोनिअल साइटवर अकाऊंट उघडलं.
नोव्हेंबर महिन्यात गीता यांची एक शस्त्रक्रीया झाली होती. त्यादरम्यान, गुप्ता जयपूरमध्ये तीन दिवस त्यांच्यासोबत होते. यावेळी दोघांमध्ये आपुलकी निर्माण झाली. नंतर त्यांचं रूपांतर लग्नात झालं. डिसेंबरमध्ये गीता व कृष्ण गुप्ता यांनी विवाह केला.