असिफ कुरणेनवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत १५ हून अधिक नेत्यांच्या मुली रिंगणात आहेत. महाराष्ट्रात सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, प्रिया दत्त, पूनम महाजन, भारती पवार, भावना गवळी, चारुलता टोकस वारसा जोमाने चालवत आहेत. राष्ट्रवादीचे माजी खा. ए. टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार भाजपतर्फे दिंडोरीत व काँग्रेसच्या नेत्या दिवंगत प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस वर्ध्यात उमेदवार आहेत. यवतमाळ-वाशिममधून पुंडलिक गवळी यांच्या कन्या भावना गवळी चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
तुतीकोडीमध्ये करुणानिधी यांच्या कन्या एम. कणिमोळी आहेत. तिथे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तामिळसाई सौंदरराजन असून, त्याही काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनंतन कुमारी यांच्या कन्या आहेत. लालूप्रसाद यांची कन्या मिसा भारती पाटलीपुत्रमधून निवडणूक लढवत आहेत. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या माजी मुख्यमंत्री, मेहबुबा सईद अनंतनागमधून रिंगणात आहेत.आसामच्या सिल्चरमधून काँग्रेस नेते संतोष मोहन देव यांची कन्या सुष्मिता देव व तेलंगणातून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता रिंगणात आहेत. भिवानीमधून काँग्रेसच्या नेत्या किरण चौधरी यांच्या कन्या श्रुती चौधरी तर आंध्रच्या आराकूमध्ये आदिवासी नेते तेलगू देसमचे उमेदवार व्ही.किशोरचंद्र सूर्यनारायण देव यांच्याविरोधात त्यांची कन्या व्ही. श्रृतीदेवी उभ्या आहेत.