Retiring Police Sub-Inspector Welcomes Daughter: मुलगी आणि बाप यांच्यातलं नातं काही वेगळंच असतं. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांसाठी लाडकी असते. जसं-जसं वडिलांचं वय वाढतं जातं, तसं घरातली तरूण मंडळी त्यांच्यावरचा भार आपल्या खांद्यावर घेतात. एखाद्या कुटुंबातली मुलगी जेव्हा घरात वडिलांकडून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते, तेव्हा वडिलांना नक्कीच हायसं वाटतं. इतकेच नव्हे तर त्या वडिलांना आपल्या लेकीचा अभिमानही वाटतो. हीच लेक जर एखाद्या ऑफिसमध्ये आपल्या वडिलांच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांच्याच कामाचा भार सांभाळायला आली आणि स्वत: तिथे रूजू झाली तर.... असाच एक भावनिक आणि तितकाच अभिमानाचा क्षण नुकताच लोकांना पाहायला मिळाला.
कर्नाटकात नुकतीच अशी एक घटना घडली. एका पित्याला अभिमान वाटावा असा हा प्रकार मंड्यात झाला. एका मुलीने आपल्या निवृत्त होणाऱ्या पित्याकडून त्यांच्याच पदाचा पदभार स्वीकारला. स्वत:च्या मुलीला मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदभार देताना एका वडिलांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वडिलांनी आपली जबाबदारी आपली मुलगी वर्षाकडे सोपवली आणि तिला पदभार देताना तिचे भावनिक स्वागत केले. इंटरनेटवर या घटनेची सध्या खूपच चर्चा रंगली आहे. आपल्या मुलीने आपली जबाबदारी स्वीकारल्यावर व्यंकटेश यांनी प्रचंड आनंद झाला आणि अभिमान वाटला.
ज्या ठिकाणी वडील तैनात होते, त्याच ठिकाणी मुलीने स्वीकारला पदभार!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश हे कर्नाटकातील मंड्या येथील सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक म्हणून तैनात होते. त्यांनी तेथे 16 वर्षे सेवा केली आणि त्यांना निवृत्त व्हावे लागले. विशेष म्हणजे त्यांच्या जागी त्यांची मुलगी वर्षा हिने गेल्या वर्षी पीएसआय परीक्षा उत्तीर्ण केली. आता बाप-लेकी जोडीचा फोटो इंटरनेटवर प्रचंड हिट झालाय.
तिच्या वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने वर्षाने पोलिस खात्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि 2022च्या बॅचमधील PSI परीक्षा उत्तीर्ण केली. नशिबाने, वर्षाला तिचे वडील ज्या स्टेशनवर काम करत होते त्याच स्टेशनवर ड्युटी देण्यात आली. वर्षाने तिच्या वडिलांच्या जागी पदभार स्वीकारण्यासाठी पाऊल ठेवताच, पोलीस स्टेशनमध्ये वडील आणि मुलीच्या या भावनिक कथेने सारेच कौतुक करू लागले. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.