चीनच्या आगळिकीनंतर पूर्व लद्दाखमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. पाठीमागून वार करण्याच्या चीनच्या सवयीमुळे त्यांना भारताच्या सैन्य कारवाईची भीती सतावते आहे. भारतानं जर चीनवर हल्ला केला तर या भागात चीनकडून भारताला प्रत्युत्तर देणं काहीसं अवघड जाईल, हे त्यांना ठाऊक आहे. चीनच्या प्रत्येक षडयंत्राला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहेत. चीनच्या या अस्वस्थतेचे मुख्य कारण म्हणजे दौलत बेग ओल्डी (डीबीओ) प्रदेशातील भारतीय सैन्याची ताकद आहे. जगातील सर्वात उंच हवाई पट्टी आणि सैन्य शिबिरामुळे डीबीओ संपूर्ण लडाखमध्ये भारताच्या अभिमानाचे प्रतीक आहे. भारतीय सैन्याची वाढती संख्या आणि या भागाचे मोक्याचे, मुत्सद्दी महत्त्व यामुळे चीन येथे कट रचत आहे. त्याचबरोबर हा वाद आणखी वाढल्यास चीनला जबर नुकसान सोसावं लागू शकतं, अशीही भीतीही त्याला सतावते आहे. डीबीओ हे एक असं क्षेत्र आहे जिथून भारतीय सैन्य चीनच्या अक्साई चीनमधील हालचालींवर लक्ष ठेवते. काराकोरम, अक्साई चीन, जियांग, गिलगिट-बाल्टिस्तान व गुलाम कश्मीरपर्यंत चीनच्या महत्त्वाकांक्षांना रोखण्याचं आणि वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यास डीबीओ नेहमीच तत्पर असते. सियाचीनमधील भारतीय सैन्यदलासाठीही हा मजबूत आधारस्तंभ आहे. भारताच्या मध्य आशियाई जमिनीशी संपर्क साधण्यासाठी हे फार महत्त्वाचे ठिकाण आहे. डीबीओ हे काराकोरम पर्वताच्या पूर्वेला असून, भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या आठ किलोमीटर दूर ईशान्येकडे आहे. 1962मध्ये इथे लष्करी चेकपॉइंटची स्थापना केली गेली होती. एकेकाळी मध्य आशियातील व्यापार हालचालींवर नजर ठेवणारा डीबीओ आता चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. त्याला सिल्क रूटचा मुख्य स्टॉप देखील म्हटले जाते. चीनच्या वाढत्या आक्रमणाच्या दरम्यान दौलत बेग ओल्डीमध्ये भारतीय लष्कराच्या हालचालीही वाढल्या आहेत. डीबीओमध्ये जगातील सर्वात जास्त उंचावरील हवाई पट्टी आहे. ही हवाई पट्टी समुद्रसपाटीपासून 16614 फूट उंचीवर आहे. 1962च्या युद्धाच्या वेळी भारतीय लष्कराने या भागात आपली चौकी स्थापन केली. यासह धावपट्टीदेखील विकसित केली गेली आणि विमानंही नेण्यात आली. 1968च्या भूकंपानंतर डीबीओमधील विमानतळ आणि सैन्य चौकी बंद करण्यात आली होती. 2008मध्ये डीबीओ पुन्हा सक्रिय केले. त्यानंतर चीनच्या हालचालींवर अधिक नजर ठेवली जात आहे. 2013मध्ये भारतीय हवाई दलाने आपले हरक्युलिस विमान येथे उतरवले होते. त्यानंतर चिनी सैन्य डेपसंग व्हॅलीमध्ये सुमारे 19 किमी पुढे भारतीय हद्दीत घुसले होते. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या सैन्याने एकमेकांच्या समोरासमोर तंबू उभे केले होते आणि हा वाद सुमारे तीन आठवड्यांनंतर निकाली निघाला.1962च्या चिनी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमा विवाद आणखी तीव्र झाले. परंतु या वादाचे मूळ बरेचसे जुने आहे. अक्साई चीन आणि त्याच्या पुढे असलेल्या लडाखच्या परिसराला चीन त्यांचा भूभाग सांगत आहे. परंतु इतिहास त्यांच्या दाव्यांचे खंडन करतो. अक्साई चीनचा बहुतांश भाग कोणासाठीही तितकासा महत्त्वाचा नव्हता. केवळ सिल्क रूटनं जोडलेली केंद्रे चर्चेत होती. 1834मध्ये पहिल्यांदा या प्रदेशावर डोगरा आणि शिखांच्या संयुक्त सैन्याने कब्जा केला होता आणि हा भाग जम्मू राज्याला जोडला होता. अशा प्रकारे पहिल्यांदा जम्मू-काश्मीरचा हा भाग झाला. तिबेट्यांशी युद्धानंतर जवळपास सात वर्षांनी शीख आणि तिबेटी लोकांनी स्वतःची सीमा निश्चित केली. 1846मध्ये ब्रिटिश आणि शीख यांच्या युद्धानंतर सुमारे पाच वर्षांनंतर लडाखचा संपूर्ण परिसर ब्रिटिश इंडियानं भारताशी जोडला. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी इंग्रजांनी चिनी राज्यकर्त्यांशी अक्साई चीन व त्याच्या आसपासच्या भागांविषयी असलेला वाद चर्चेतून सोडविण्याचा प्रयत्न केला. पण चीनने त्या क्षेत्रामध्ये फारसा रस दाखविलेला नव्हता. दोन्ही बाजूंनी पँगॉग तलाव आणि काराकोरमच्या भागाला सीमा मानली, परंतु त्या दरम्यानची सीमा कधीही निश्चित केली गेली नाही. चीन आणि लडाख यांच्यात कोणताही वाद होऊ नये म्हणून ब्रिटिश अधिकारी डब्ल्यूएचओ जॉन्सन यांनी 1865मध्ये जॉन्सन लाइनचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी अक्साई चीनला पूर्णतः जम्मू-काश्मीरचा भाग सांगितला होता. त्यावेळी चीनचा जिआंगवर कोणताही ताबा नव्हता आणि जिआंगची सीमा अक्साई चीनला लागून होती. त्यामुळे जॉन्सन लाइनसंदर्भात त्यावेळी चीननं कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती.हेही वाचा
...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट
CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'
आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर
CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली