"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:57 IST2025-04-11T16:52:57+5:302025-04-11T16:57:38+5:30
वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने हिंसाचार करण्याचा सल्ला दिला आहे.

"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले
Waqf Amendment Bill 2025: वक्फ दुरुस्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही देशभरात त्याचा विरोध सुरुच आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर, देशाच्या विविध भागांमधून निषेध सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. अशातच कर्नाटकातकाँग्रेसच्या माजी नगरसेवकाने प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे समोर आलं आहे. काँग्रेस नेत्याने वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांना रस्त्यावर उतरून बलिदान द्यायला हवं असा सल्ला दिला.
कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कबीर खान यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना भडकवल्याचे समोर आलं आहे. एका व्हिडीओमध्ये कबीर खान हे वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना हिंसक आंदोलन करण्याचा सल्ला देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक शहरात आठ ते दहा लोक मरू द्या, असं विधान कबीर खान यांनी केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, कबीर खान तरुणांना रस्त्यावर येण्याचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे आणि कायद्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन करताना दिसत आहे.
"पोस्टर पकडून, निवेदन देऊन काही फायदा होणार नाही. रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जाळा, मरा, प्राणांचे बलिदान द्या. प्रत्येक गावातून ८-१० लोक मरायला हवेत. ५०-१०० गुन्हे दाखल व्हायला हवेत. बस, ट्रेन जाळा. या गोष्टी फक्त बोलून होत नाही. हिंदुस्तानात आज कोणीही आपले नेतृत्व नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने ते बिल रद्द होणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याग, बलिदान द्यावे लागेल," असे कबीर खान यांनी म्हटलं.
दरम्यान, दोन मिनिटांची ही क्लिप अज्ञात ठिकाणी रेकॉर्ड करुन ८ एप्रिल रोजी ऑनलाइन शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कबीर खानविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून खानचा मोबाईल फोन बंद आहे आणि त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.