ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - मुंबई बाँबस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आमच्या देशात नसल्याचं पाकिस्तान सांगत असतानाच त्याच्या पत्नीशी मेहजबीन शेखशी टाइम्स नाऊनं फोनवर संवाद साधला असता, दाऊद या कराचीतल्या घरीच असून तो आत्ता झोपलेला असल्याचं उत्तर तिनं दिलं. दाऊद पाकिस्तानातच असल्याचा कागदोपत्री पुरावा भारतीय सुरक्षा अधिका-यांच्या हातात लागला असून हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने दाऊदचा आत्ताचा फोटो, त्याच्या पत्नीच्या नावे कराचीत असलेल्या टेलिफोनच्या बिलाचा फोटो, शेख दाऊद हसन नावाने दिलेल्या पासपोर्टचा फोटो या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध केल्या आहेत. टाइम्स नाऊच्या अॅनालिसिस टीमनं या बिलावर असलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता, एका महिलेने फोन उचलला आणि तिने आपण दाऊद इब्राहिमची पत्नी असल्याचं सांगितलं. तसेच दाऊद झोपलेला असल्याचंही ती म्हणाली. थोड्या वेळानंतर टाइम्स नाऊने पुन्हा फोन केला असता फोन मध्येच कट करण्यात आला.
दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची ठरल्याप्रमाणे सोमवारी भेट झालीच तर अजित डोवाल हा सगळा पुरावा पाकिस्तानला दाखवतील अशी शक्यता आहे. दाऊद इब्राहिमला आंतरराष्ट्री स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले असून त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही आहे.
भारतीय सुरक्षा रक्षकांच्या माहितीनुसार दाऊद इब्राहिम कराचीतल्या क्लिफ्टन या भागात पत्नी, मुलगा मोईन नवाझ व मुली माहरूख, मेहरीन व माझिया यांच्यासह राहत आहे. माहरूखचे जावेद मियाँदादचा मुलगा जुनेद याच्याशी लग्न झाल्याचे सर्वश्रुत आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या डी-१३, ब्लॉक - ४. कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी, स्कीम - ५, क्लिफ्टन या पत्त्यावरील एप्रिल २०१५ या महिन्याचे टेलिफोनचे बिल सुरक्षारक्षकांच्या हाती लागले आहे.
दाऊदकडे तीन पाकिस्तानी पासपोर्ट आहेत आणि दोन घरं आहेत अशी भारताची माहिती आहे. दाऊदचे कुटुंबीय पाकिस्तानातून दुबईला गेल्या काही महिन्यांमध्ये कधी गेले, कधी परतले याचा इत्यंभूत तपशीलही भारताच्या हाती असून त्यांच्या पासपोर्टची सगळी माहितीही सुरक्षा दलांकडे आहे. दाऊदचा नवा फोटो जो, हिंदुस्थान टाइम्सने (या बातमीतही हाच फोटो हिंदुस्थान टाइम्सच्या सौजन्याने वापरण्यात आला आहे) प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये दाऊदने कॉस्मेटिक सर्जरी केली नसल्याचे दिसत आहे.
जबीर सादिक, जावेद छोटानी आणि चिकना जावेद हे दाऊदचे सहकारीही पाकिस्तानाच असून तेदेखील वरचेवर दुबईला जात असल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले आहे. जावेद चिकना हा देखील मुंबई बाँबस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असून तो ISI च्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. गेली दोन दशके पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नसल्याचा दावा सातत्याने केला आहे.
बनावट नोटांचे वितरण, हवाला रॅकेट, भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात हस्तक्षेप, सिनेमांच्या पायरसीमध्ये सहभाग आणि बॉलीवूडमधल्या चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय वितरणाच्या व्यवसायात सक्रीय असणे अशा अनेक प्रकारे दाऊद इब्राहिमचा वावर असल्याचे सुरक्षा दलांना माहीत असले तरी अद्याप भारताला दाऊदविरोधात काहीही कारवाई करता आलेली नाही. या नव्याने हाती आलेल्या पुराव्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करण्यास मदत होईल असा अंदाज आहे.