ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असा दावा दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात दाऊदसोबत चर्चा करावी लागेल, असेही केसवानी यांनी सांगितले.
केसवानी यांनी सांगितले की, भारतात येण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट दाऊदने पाच वर्षांपूर्वी सरकारसमोर ठेवली होती. मात्र, तत्कालीन सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही.
'दाऊदचा माणूस माजी मंत्री राम जेठमलानी यांना लंडनमध्ये भेटला होता, त्यावेळी त्याने दाऊद भारतात येण्यास तयार आहे, मात्र मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट त्याने जेठमलानींसमोर ठेवली होती', असे केसवानी यांनी सांगितले आहे.
मात्र, दाऊदची अट तत्कालीन सरकारने मान्य केली नाही. तर दुसरीकडे सरकारने अबू सालेम आणि छोटा राजनच्या अटी मान्य करत त्यांना भारतात आणले, असा गौप्यस्फोटही केसवानी यांनी केला आहे.
आणखी बातम्या
अबू सालेमने फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, तर छोटा राजनने तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट सरकारसमोर ठेवली होती. सरकारने या दोन्हीही अटी मान्य केल्या, त्याचेवळी दाऊदच्या अटीकडे दुर्लक्ष केले, असे केसवानी यांनी सांगितले.
श्याम केसवानी यांच्यानुसार दाऊदची अट अगदी किरकोळ आहे. मात्र तरीही सरकार दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरेच काही कारण आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
दरम्यान, दाऊद इब्राहिमला सरकारकडून सुरेक्षची हमी मिळाल्यास, तो भारतात येईल. याआधीही सुरक्षेच्या अटीवरच त्याने भारतात येण्यास सहमती दर्शवली होती, असा दावाही केसवानी यांनी केला आहे.