ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 06 - देशामध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी, जातीय तणाव वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसंच चर्चेवर हल्ले करण्याचा कट भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'ने आखला होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. डी कंपनीने सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी आपल्या 10 लोकांवर ही जबाबदारी सोपवली होती. धार्मिक नेत्यांसोबतच संघाचे नेते आणि चर्चेवर हल्ले करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे 2014मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ही कट रचण्यात आला होता. एनआयए या 10 जणांविरोधात लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे.
शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या याच कटाचा भाग होती. गुजरातमधील भारुच येथे 2 नोव्हेंबर 2015 ला ही हत्या करण्यात आली होती. डी कंपनीच्या शार्प शुटर्सने ही कामगिरी पुर्ण केली होती. या शार्प शूटर्सना नंतर अटक करण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनच्या फाशीचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा दावा त्यांनी तपासात केला होता.
भाजपा आणि संघाच्या नेत्यांची हिटलिस्ट
एनआयएने केलेल्या तपासाच डी कंपनीचे सदस्य पाकिस्तानमधील जावेद चिकना आणि दक्षिण अफ्रिकेतील झाहीद मियान उर्फ जाओ या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आहे. इतकच नाही तर त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात जातीय तणाव वाढावा यासाठी संघाचे नेते आणि चर्चेवर हल्ले करण्याची योजना आखली होती. जावेद चिकना आणि झाहीद मियानने हल्ला करण्यासाठी भाजपा आणि संघाच्या नेत्यांची यादीच तयार केली होती अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
जावेद चिकनाला पकडण्यासाठी एनआयएने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्याला अटक करुन भारताच्या हवाली करण्याची विनंती केली आहे. तसंच पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबिया, अमेरिका आणि दुबई या देशांना न्यायालयीन विनंती तसंच म्युच्युअल कायदेशीर सहाय्य मान्यता करार विनंती पाठवली आहे.
डी कंपनीच्या 10 जणांविरोधात चार्जशीट
एनआयए आपल्या चार्जशीटमध्ये डी कंपनीच्या 10 जणांची नाव देणार आहे ज्यामध्ये गेल्यावर्षी अटक करण्यात आलेल्या सात जणांचा समावेश आहे. हाजी पटेल, मोहम्मद युनूस शेख, अब्दुल समाद, अबिद पटेल, मोहम्मद अलताफ, मोहसीन खान आणि निसार अहमद अशी त्यांची नावे आहेत. अबिद पटेल हा जावेद चिकनाचा भाऊ असून शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री याच्या हत्येसाठी त्याला 50 लाख रुपये देण्यात आले होते.
चार्जशीटमध्ये जावेद चिकना आमि झाहीद मियानचं नावदेखील असणार आहे, मात्र दाऊदचं नाव देण्यात येणार नाही आहे. त्याच्याविरोधात पुरावे मिळाले तर त्याचं नाव अतिरिक्त चार्जशीटमध्ये टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.