गुरूग्राम- भोंडसीमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. शाळेच्या परीक्षा आणि शिक्षक-पालक मिटिंग पुढे ढकलण्यासाठी या विद्यार्थ्याने हत्येचा कट रचला. आरोपी विद्यार्थ्यांने सीबीआयला ही संपूर्ण माहिती दिली. या हत्या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 8 सप्टेंबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकाची हत्या निश्चित होती. शाळेच्या परीक्षा आणि शिक्षक-पालक मिटिंग पुढे ढकलण्यासाठी काही ठोस कारण हवं, ज्यामुळे शाळाच बंद राहील, असा विचार करून आरोपीने शाळेत चाकू आणला होता. त्या दिवशी शाळेत कोणाची तरी हत्या होणार, हे निश्चित होतं, असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रद्युम्न त्या दिवशी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला म्हणूनच त्या चिमुरड्याने जीव गमावल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं. टाइम्स ऑफ इंडियाने ही सविस्तर माहिती दिली आहे.
8 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत आल्यावर प्रद्युम्न त्याच्या पाचवीत शिकणाऱ्या मोठ्या बहिणीला बाय केल्यानंतर त्याच्या वर्गात गेला. त्यानंतर तो शौचालयात गेला. त्याचवेळी ही संपूर्ण घटना घडली. 'मी पूर्णपणे ब्लॅन्क झालो आणि कृत्य केलं', अशी कबुली आरोपीने तपासादरम्यान दिल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हत्येच्या वेळी वापरलेला चाकू पोलिसांना घटनास्थळी सापडला होता. त्या चाकूची आरोपीच्या वर्गमित्रांकडून आणि शिक्षकांकडून पडताळणी करण्यात करण्यात आली. प्रद्युम्नची हत्या करण्याच्या दोन दिवस आधी त्याने तो चाकू शाळेत आणला होता का, याचाही तपास झाला.
8 सप्टेंबर रोजी आरोपी चाकू घेऊन शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या गॅलेरीमध्ये उभा राहून कोणी येत का? त्याची वाट पाहत होता. त्याचवेळी प्रद्युम्न तेथे आला आणि आरोपीने त्याला टार्गेट केल्याचं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी अभ्यासात हुशात नव्हता तसंच तो नेहमी शाळेला सुट्टी घ्यायचा. अभ्यासात हुशार नसला तरी तो उत्तम पियानो वाजवायचा. वर्गात न बसता तो शाळेतील म्युझिक रूममध्ये बसलेला असायचा. पियानो वाजविण्याची उत्तम कला असल्याने तो शाळेत प्रसिद्ध होता. आरोपीची विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे प्रद्युम्न सहजपणे त्याच्याबरोबर शौचालयात गेला असावा, असा अंदाज वर्तविला जातो आहे.