नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नंबर प्लेटवरील सम आणि विषम क्रमांकानुसार दिवस निश्चित करण्यात आले आहेत. विषम क्रमांक असलेल्या कार सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर सम क्रमांक असलेल्या कार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावताना दिसतील.पीसीआर व्हॅन, अग्निशामक दलांची वाहने, रुग्णवाहिका, तसेच आपत्कालीन स्थितीवर नियंत्रण मिळविणाऱ्या वाहनांसाठी मात्र कोणतीही बंधने नसतील, असे दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले. राजधानीत विषारी वायूची समस्या असून ती दूर करण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. सम-विषम क्रमांकाच्या कारनुसार ठरविण्यात आलेले दिवसांचे बंधन सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाळायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जैन यांच्याकडे सार्वजनिक आणि बांधकाम विभागाचाही कार्यभार आहे. मी स्वत: हा नियम पाळणार असून नियम न पाळणारा कोण आहे याची तमा बाळगली जाणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले. (वृत्तसंस्था)
दिल्लीत कार्ससाठी दिवसांची विभागणी
By admin | Published: December 07, 2015 1:43 AM