मुंबई - टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने लगावलेला उत्तुंग षटकार आणि देशभरात एकच जल्लोष झाला. आजच्याचदिवशी 10 वर्षांपूर्वी कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी विश्वचषक उंचावला आणि देशभरात दिवाळी साजरी झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 10 वर्षांपूर्वीच्या विश्वविजयाच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
विश्वचषक 2011 च्या स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज केले. कपिल देव यांनी 1983 मध्ये उंचावलेल्या वर्ल्डकपनंतर भारताने 2011 मध्येच विश्वविजयाचा जल्लोष साजरा केला होता. आजच्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल 2011 रोजी हा आनंद साजरा करण्यात आला होता. त्यामुळे, या विजयी उत्सावाचे 10 वर्षांनीही सेलिब्रेशन होत आहे. त्यामुळेच, अनेक क्रिकेटर्स या विजयाच्या आठवणी जागवत आहेत.
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हा कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगून होम क्वारंटाईन होत असल्याचे सचिननं सांगितले होते. पण, शुक्रवारी त्यानं एक ट्विट करून वैद्यकिय सल्ल्यानुसार आता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत असल्याची माहिती दिली. तसेच, रुग्णालयात असतानाही, वर्ल्ड कप विजयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व भारतीय व संघातील सहकाऱ्यांना शुभेच्छा, असेही सचिनने ट्विटमध्ये म्हटलंय.
भारतीय संघाच्या विश्वविजयाची महाराष्ट्रालासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्रपुत्र सचिन तेंडुलकरचं स्वप्न पू्र्ण झालं होतं, आणि यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष हे शरद पवार होते. त्यामुळे, या दोन मराठमोळ्या दिग्गजांनी वर्ल्डकप उंचावला होता. जयंत पाटील यांनीही शरद पवारांनी वर्ल्डकप उंचावलेला फोटो शेअर केला आहे. विश्वविजयाच्या या आठवणी सदासर्वकाळ आपल्यासोबत राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटलंय. मीही त्या रात्रीचा साक्षीदार होतो, जेव्हा मास्टरब्लास्टर सचिनला विराटने मैदानावरच आपल्या खांद्यावर उचलले होते. या धोनीच्या टीमचं आणि भारतीय संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन पाहण्याचा भाग्य आपल्याला लागलं, असेही पाटील यांनी म्हटलयं.