पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासमोर एक अनोखीच याचिका आली. यामध्ये याचिकाकर्त्यानं ब्रिटीश राजघराण्याच्या प्रिन्स हॅरी यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. प्रिन्स हॅरी यांनी आपल्याला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, जे पूर्ण झालेलं नाही, असं याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेत म्हटलं होतं. याचिकाकर्त्यानं प्रिन्स हॅरी यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्याचीही मागणी केली. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करत असताना याचिकाकर्त्या हे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत आहेत, असं न्यायालयानं म्हटलं. आश्चर्याची बाब म्हणजे याचिकाकर्त्या एक वकील आहेत. त्या स्वत: खटला लढवण्यासाठी न्यायालयात पोहोचल्या होत्या. न्यायालयानं विशेष अर्जावर न्यायालयाच्या थेट सुनावणीस मंजुरी दिली. दरम्यान, लग्न करण्यास अजून विलंब होऊ नये यासाठी प्रिन्स हॅरी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. लाईव्ह लॉ नुसार त्यांनी न्यायालयाला काही ईमेलदेखील दाखवले. याचिकाकर्त्या महिलेनुसार ते प्रिन्स हॅरी यांनी पाठवले असून त्यांनी लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं. सुनावणी दरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्या महिलेल्या त्या कधी युनायडेट किंगडमला गेल्या आहेत का अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना त्यांनी आपण त्या ठिकाणी कधीही गेलो नसल्याचं म्हटलं. आपलं प्रिन्स हॅरी यांच्याशी केवल सोशल मीडियाद्वारे बोलणं होत होतं असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. "फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडिया साईट्सवर बनावट आयडी तयार केले जातात हे सत्य काही लपलेलं नाही. हे प्रिन्स हॅरी हे पंजाबच्याच कोणत्यातरी गावात बसले असतील," असंही न्यायमूर्ती अरविंद सिंग सांगवान यांनी याचिका फेटाळताना म्हटलं.
प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:45 PM
उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, याचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील
ठळक मुद्देउच्च न्यायालयात दाखल केली होती याचिकायाचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील