नवी दिल्ली-
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) भारतातील दोन महत्त्वाच्या Covishield आणि Covaxin या कोरोना विरोधी लसींच्या बाजारातील विक्रीला सशर्त परवानगी दिली आहे. असं असलं तरी लस थेट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार नाही. हॉस्पीटल्स आणि क्लिनिकमध्ये लस खरेदी करता येऊ शकणार आहे. तसेचं तिथेच ती दिली देखील जाईल. खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचा संपूर्ण डेटा संबंधित खरेदीदारांना डीसीजीआयकडे दर सहा महिन्यांनी सुपूर्द करावा लागणार आहे. संपूर्ण डेटा कोविन अॅपवर देखील अपडेट होणार आहे. दरम्यान, लसींची विक्री किंमत नेमकी किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
दोन्ही लसी केवळ देशात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत आहेत. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने, 19 जानेवारी रोजी, Covishield आणि Covaxin ची काही अटींसह प्रौढांसाठी नियमितपणे विक्री करण्यास मान्यता देण्याची शिफारस केली होती. आपत्कालीन वापरात सेफ्टी डेटा DCGI ला १५ दिवसांच्या आत द्यावा लागतो. सशर्त मंजुरी दिल्याने ६ महिने किंवा त्याहून अधिक कालावधीत डेटा DCGI कडे सादर करावा लागेल. तसेच ही माहिती को-विनवर देखील द्यावी लागेल. याआधी अमेरिकेतील फायझर आणि यूकेमधील अॅस्ट्राझेनेका या लसींना बाजार विक्रीसाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे.