DCGI on Cough Syrup: मागील काही काळापासून भारतात बनवलेल्या कफ सिरपची चर्चा सुरू आहे. या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा काही देशांनी केला आहे. आता या कफ सिरपबाबत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने(DCGI) ने मोठा निर्णय घेतलाय. DCGI ने 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कफ सिरप वापरण्यास बंदी घातली आहे. यासोबतच DCGI ने औषधांवर लेबल लावण्याचे आदेशही दिले आहेत. DCGI ने 18 डिसेंबर रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन, या दोन औषधांचा वापर करुन बनवलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे. DCGI ने पत्रात म्हटले आहे की, औषधामध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन किती प्रमाणात वापरण्यात आले आहे, हे पॅकेजिंगवर लिहणे बंधनकारक असेल.
या औषधांच्या मिश्रणातून तयार केलेले सिरप किंवा गोळ्या सामान्य सर्दीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात. 2022 मध्ये भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे गांबिया, उझबेकिस्तान इत्यादी देशांमध्ये नोंदवली गेली होती. 2022 मध्ये मेडेन फार्माच्या 4 सिरपमुळे सुमारे 70 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
यातील बहुतांश मुलांचे वय 5 वर्षाखालील होते. एका भारतीय कंपनीने बनवलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे गांबिया सरकारने केलेल्या तपासणीत आढळून आले होते. याशिवाय, भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तान सरकारनेही केला होता. यामुळे आता DCGI ने हा निर्णय घेतला आहे.