नवी दिल्ली
DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाच्या (DCGI) तज्ज्ञांच्या समितीनं शुक्रवारी कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मार्केटिंग अप्रूव्हलसाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं दिलेल्या अर्जांची पडताळणी केली होती. त्यानंतर आता समितीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनला खुल्या बाजारात विक्रीसाठी शिफारस केल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं देखील याबाबतचं वृत्त दिलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोविशील्ड लसीच्या मार्केटिंगसाठीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तर भारत बायोटेकनंही कोव्हॅक्सीनच्या मार्केटिंगसाठी नुकताच अर्ज दाखल केला आहे. 'कोविशील्ड लसीच्या संपूर्ण मार्केटिंग ऑथोराजयझेशनचा विचार करण्यासाठी सरकारकडे आता आवश्यक अशी सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे', असं ट्विट देखील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी केलं होतं.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. देशात कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस वापरली जात आहे.