DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती वेंकटेश्वर बालाजी मंदिरात लाडू प्रसादाच्या वादावरून राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण करण्यासाठी चार तासांचे शांती होम पंचगव्य प्रोक्षण करण्यात आले. होमहवन पहाटे ६ वाजता सुरू झाले आणि १० पर्यंत चालले. भगवान व्यंकटेश्वर यांचे पावित्र्य पुन्हा बहाल करण्याच्या उद्देशाने आणि भाविकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा विधी करण्यात आला. यानंतर आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी देवाची माफी मागणार असल्याचे म्हटले आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनी या वादाप्रकरणी ११ दिवसांची प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा घटना रोखू शकलो नाही, याची खंत वाटते, असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे. पवन कल्याण यांनी विजयवाडा येथील दुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिरात स्वच्छता, साफ सफाई केली. पवन कल्याण ०१ ऑक्टोबरपर्यंत प्रायश्चित घेणार आहेत. यानंतर ते तिरुपती बालाजी व्यंकटेश मंदिरात जाऊन देवाकडे क्षमा मागणार आहेत.
प्रकाश राज यांच्या टीकेला पवन कल्याण यांचे प्रत्युत्तर
प्रकाश राज यांना प्रत्युत्तर देताना पवन कल्याण यांनी सांगितले की, या प्रकरणात का बोलू नये? प्रकाश राज तुमचा आदर करतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार केला तर ते म्युच्युअल असले पाहिजे. मला समजत नाही की, तुम्ही माझ्यावर टीका का करत आहात? सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत मी बोलू शकत नाही का? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा. चित्रपटसृष्टीने किंवा कोणीही हा विषय सामान्य समजू नये, सनातन धर्माबाबत मी खूप गंभीर आहे, असे पवन कल्याण यांनी स्पष्ट केले. तसेच सनातन धर्म सर्वांत महत्त्वाचा आहे. या बाबतीत प्रत्येक हिंदूने जबाबदारी घेतली पाहिजे. इतर कोणत्याही धर्मात असे घडले असते तर फार मोठे आंदोलन झाले असते, असे पवन कल्याण म्हणाले.
दरम्यान, प्रिय मित्रा, तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लावावी. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून काढावे आणि त्यांना कठोर शिक्षा करावी. पण हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात धार्मिक तणाव कमी आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार), अशी पोस्ट प्रकाश राज यांनी केली होती.