नवी दिल्ली - छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे. या हल्ल्यात बालंबाल बचावलेले दूरदर्शनचे सहाय्यक कॅमेरामन मोर मुकुट शर्मा यांनी हा व्हिडीओ चित्रित केला असून, त्यात हल्ला झाला तेव्हाची परिस्थिती आणि स्वत:ची झालेली मनोवस्था चित्रित केली आहे. हा व्हि़डीओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मोर मुकुट शर्मा सांगतात की, "तीन पत्रकार आणि सुरक्षा दलांचे जवान असे मिळून दहा जण जात असताना शेतात लपलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. अच्युतानंद साहू यांची दुचाकी सर्वात पुढे होती. हल्ला झाला तेव्हा त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली. दरम्यान, आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्याचा आसरा घेऊन लपलो. त्यावेळी आमच्यात आणि नक्षलवाद्यांमध्ये जेमतेम 25 ते 30 फुटांचे अंतर होते.''हा व्हिडीओ चित्रित करण्यामागची गोष्टही मोर मुकुट शर्मा यांनी सांगितली आहे. ""हल्ला झाला तेव्हा मला खूप तहान लागली होती. मात्र आता काहीच मिळू शकणार नाही, असे माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा वाटले आता सगळे संपले आहे. समोर मृत्यू दिसत आहे. माझे सहकारी असलेल्या कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. वाटले आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून मी माझ्या जीवनातील शेवटचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. मला आईची आठवण येत होती. मी रोज गीता वाचतो. त्यामुळे गीतेचे सार आठवून मी देवाचा धावा करू लागलो. व्हिडीओ चित्रित करून झाल्यानंतरही मी देवाचे नाव घेत होतो.", असे शर्मा म्हणाले. हा व्हिडीओ अचानक बंद होतो. त्यामुळे तेव्हा तिथे नक्षलवादी आल्याची शंका वर्तवण्यात येत होती. मात्र त्याबाबत शर्मा सांगतात, "आम्ही जिथे लपलो होतो तिथे लाल मुंग्यांचे वारुळ होते. त्यातील मुंग्या अंगावरून फिरत असल्याने मला व्हिडीओ बंद करावा लागला. आम्ही जिथे लपलो होतो. तेथील झाडावर गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी त्या झाडाची चाळण केली होती. त्यामुळे जर मुंग्यांपासून बचावासाठी आम्ही हालचाल केली असती. तर नक्षलवाद्यांनी आम्हाला लक्ष्य बनवले असते." "सुमारे 40 मिनिटे गोळीबार सुरू होता. असा भयानक आवाज मी केवळ चित्रपटांमध्येच ऐकला होता. शेकडो नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला असावा, असे आम्हाला वाटत होते. आमच्यासोबत केवळ सात जवान होते. त्यापैकी दोघे शहीद झाले. तर माझे सहकारी असलेले कॅमेरामन साहू यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर जे सैनिक मुख्य रस्त्यापर्यंत आले होते. त्यांनी मोर्चा सांभाळला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला." अशी माहिती मोर मुकुट शर्मा यांनी दिली.