नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराची दिल्ली सरकारने चौकशी करणे घटनाविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचा दावा केंद्र सरकारने केला असून दोन सरकारमधील संघर्ष वेगळ्या वळणावर पोहोचला आहे.दिल्ली राजधानी क्षेत्राच्या सरकारमधील दक्षता संचालकांनी जारी केलेला चौकशीचा आदेश असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्यामुळे त्याचा कायदेशीररीत्या कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले असल्याचे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. महिन्यापूर्वी दिल्ली सचिवालयावर सीबीआयने छापे मारल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या पाच नेत्यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. दिल्ली सरकारने चौकशी आयोेग नेमणे बेकायदेशीर असल्याचे केंद्राने स्पष्ट केल्यामुळे दोन सरकारमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डीडीसीएच्या चौकशीवरून केंद्र-राज्य संघर्ष शिगेला
By admin | Published: January 09, 2016 3:36 AM