ओळख न पटविताच मृतदेह पुरला-१
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM
ओळख न पटविताच मृतदेह पुरला
ओळख न पटविताच मृतदेह पुरला अजनी पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस : कुटुंबीय मानसिक धक्क्यात नागपूर : संदिग्ध अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाच्या मृतदेहाची ओळख न पटविताच तो बेवारस समजून पुरण्यात आला. अजनी पोलिसांनी केलेला हा निष्काळजीपणा गुरुवारी उघडकीस आला.या घटनेमुळे मृत तरुणाचे कुटुंबीय प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. स्वत:ची चूक लक्षात येताच अजनी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. राहुल देवेश खंडागळे (२५) रा. हावरापेठ असे पुरण्यात आलेल्या मृताचे नाव आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडील भाऊ सुरेंद्र आणि मिलिंद आहेत. वडील छिंदवाडा येथील गावात राहतात. दोघेही भाऊ वाहन चालक आहेत तर आई मोलकरीण आहे. राहुल नेहमी बाहेरगावी टूरवर राहत असल्याने त्याचे घरी येणे-जाणे कमीच होते. ११ जून रोजी रात्री राहुल घरी आला. काही वेळ थांबला आणि नवीन कपडे घालून रात्री १०.३० वाजता रवाना झाला. त्याने मोठा भाऊ सुरेंद्र याला सांगितले होते की, तो टूरवर जात आहे. राहुलजवळ मोबाईल होता. परंतु सिम कार्ड नसल्याने सुरेंद्रने त्याला सिमकार्ड विकत घेऊन फोन करण्यास सांगितले. राहुल घरून निघाला आणि शताब्दीनगर चौकातील ऑटो स्टॅँडवर गेला. सुरेंद्रने त्याला जाताना पाहिले. यानंतर रात्री ११.५० वाजता मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी अजनी पोलिसांना रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावरील वॉर्ड क्रमांक ३४ च्या समोरील भिंतीवरून पडून एक तरुण जखमी झाल्याची सूचना दिली. तो तरुण राहुलच होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला आकस्मिक विभागात भरती केले. तिचे त्याचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांना राहुलच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड आणि मोबाईल सापडला. परंतु अजनी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना शोधण्यास गंभीरता दाखविली नाही. पोलिसांनी बेवारस मृतदेहाला तीन दिवस ठेवण्याची आवश्यकता तेवढी पूर्ण केली. त्यानंतर गंगाबाई घाटावर नेऊन मृतदेह पुरला. यादरम्यान राहुल टूरवर असल्याचे समजून त्याच्या कुटुंबीयांनी फारसे लक्ष दिले नाही. बेवारस मृतदेहाच्या कुटुंबीयांना एक महिन्यानंतरही शोधता आले नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजनी पोलिसांना फटकारले तेव्हा कुठे अजनी पोलीस कामाला लागले.