नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,37,03,665 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,58,317 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटीहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदापूर गावातील मुळची केन नदीची उपनदी असलेल्या रूंझ नदीत काही मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत की नाही याबाबत माहिती नाही. मात्र आम्ही गावातील मुलांना नदीत वाहणारे मृतदेह बाहेर काढण्यास मनाई केली आहे. कारण यामुळे गावात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी आम्हाला भीती असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच गावातील लोक यांच नदीचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात.
नदीची स्वच्छता करण्याची मागणी
नदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्याने पिण्यासाठी आता नेमकं कोणतं पाणी वापरायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने या नदीची स्वच्छता करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे पन्ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कुमार मिश्रा यांनी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच नदीत फक्त दोन मृतदेह आढळल्याचं म्हटलं आहे. हे कॅन्सरग्रस्तांचे मृतदेह असून शेजारील गावातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मृतदेह पारंपारिक विधीचा भाग म्हणून नदीत सोडण्यात आले असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज 100 ते 200 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बिहारमध्येच दोन डझनांहून अधिक रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचे उघडकीस आले होते. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या खासदार निधीतून या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली होती. कटीहारमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची नदीत विल्हेवाट लावण्याचा प्रकार एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला आहे. रुग्णवाहिकेतून कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नदीत फेकण्यात येत असल्याचे त्यात दिसत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.