चंढीगड - हरियाणातील हिसारमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात, आता येथील शेतकऱ्यांवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप लावला जात आहे. 69 वर्षीय शेतकरी रामचंद्र खरब यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी आंदोलनस्थळावर या शेतकऱ्याला नेले. तेथेच शेतकऱ्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर, या शेतकऱ्याला आंदोलनकर्त्यांनी शहीद दर्जा दिल्याचा आरोप लावण्यात येत आहे.
रामचंद्र यांचा मृतदेह ज्यावेळी गर्दीत ठेवण्यात आला, त्यावेळी एक शेतकरी नेता भाषण देत होता. त्यावेळी, भाषण मध्येच थांबवत रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिटांचे मौन धारण करण्यात आले. त्यानंतर, मृत शेतकरी रामचंद्र यांना शहीद घोषित करण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थीव तिरंग्यात लपटण्यात आले. उगलान येथील रहिवाशी असलेल्या रामचंद्र हे कारमधून हिसारसाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
रामचंद्र हे भारतीय किसान युनियनचे सदस्य असून 1 आठवड्यापूर्वीच ते दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवरुन परतले होते. जवळपास 15 दिवस ते दिल्लीच्या आंदोलनस्थळी उपस्थित होते. रामचंद्र यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. रामचंद्र यांचा मृतदेह गर्दीत ठेवला असतानाही एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावल्याचे दिसून आले नाही. 16 मे रोजी 350 शेतकऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी हे सर्वच शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनकर्त्यांकडून दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवळपास 400 शेतकऱ्यांना शहीद असल्याचं सांगण्यात येत आहे.