झारखंडच्या पाकूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पाकूर येथील एका खासगी शाळेत मुलांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेली पाल सापडल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हे अन्न खाल्ल्यानंतर 100 हून अधिक मुलं आजारी पडली आणि त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकूरच्या पकुडिया ब्लॉकमध्ये असलेल्या एका खासगी शाळेत पाल पडल्याने आणि तेच अन्न खाल्ल्याने 100 हून अधिक विद्यार्थी आजारी पडले. सर्व मुलांना उलट्या आणि डोकेदुखी सुरू झाली. यानंतर 60 हून अधिक मुलांना तात्काळ पश्चिम बंगालमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. 40 हून अधिक मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्रशासनालाही याबाबत कळविण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना समोर आली होती. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील डुमरा ब्लॉकमधील रिकौली येथे मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली होती.
मुलांनी गंभीर आरोप केला होता की, जेवणात पाल पडली होती आणि त्याबाबत तक्रार करूनही शाळा प्रशासनाने जबरदस्तीने मुलांना अन्न खाऊ घातलं होतं. मुलं आजारी पडल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले नाही. पालकांना याची माहिती मिळताच सर्वांनी तेथे धाव घेत शाळेचा दरवाजा तोडला. स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. डुमरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलांना रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस वाहनातून मुलांना डुमरा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले होते.