अयोध्या : कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात आता लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरण केले जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशमधीलअयोध्या येथे लसीकरण यादीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत तयार करण्यात आलेल्या लसीकरण लाभार्थ्यांच्या यादीत मृत नर्स, निवृत्त आणि करार संपुष्टात आलेल्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशात १६ जानेवारीपासून ८५२ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.
कोरोना लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीत आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अयोध्येतील कोरोना लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत घोळ झाल्याचे समजताच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशात डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. स्वतंत्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या केवळ ८ ते १० हजारांच्या घरात आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम पाहायला मिळतो. सरकार आता नवीन धोरण आणण्याच्या तयारीत असून, आता थेट लोकसेवा आयोगातून भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी दिली.
दरम्यान, १६ जानेवारीपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील एकूण ८५२ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील १५०० केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली होती.