बिहारची राजधानी पाटणामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (NMCH) मध्ये एका रुग्णाचा डोळा त्याच्या मृत्यूनंतर गायब झाल्याचं आढळून आलं. हा प्रकार मृताच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी एकच गोंधळ घातला.
नालंदा येथील हिंसाचारात गोळी लागल्याने फंटूश नावाच्या व्यक्तीला १४ नोव्हेंबर रोजी एनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्याने फंटूश याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान १५ नोव्हेंबरला सकाळी डॉक्टरांनी फंटूशला मृत घोषित केलं. आता कुटुंबीयांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा डोळा काढल्याचा आरोप केला आहे.
फंटूशच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांनी त्याच्या पोटात गोळी झाडली, त्यानंतर त्याला १४ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऑपरेशन दिवसा झालं आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र रात्र झाल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही त्यामुळे मृतदेह अतिदक्षता विभागात बेडवर ठेवण्यात आला.
शनिवारी सकाळी शवविच्छेदनाची तयारी सुरू झाली, तेव्हा मृताचा डावा डोळा गायब असल्याचं आढळून आलं आणि जवळच ब्लेड ठेवलं होतं. 'आज तक'शी बोलताना त्याचा पुतण्या अंकित कुमार म्हणाला, माझ्या काकांचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर ते सकाळी मृतदेह पाहण्यासाठी गेले, तेव्हा डावा डोळा गायब होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आम्हाला संशय आहे.
वाढता गोंधळ पाहून एनएमसीएच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनोद कुमार पुढे आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं. एकतर कोणीतरी डोळा काढला आहे किंवा उंदराने डोळा कुरतडला आहे. याची पडताळणी केली जात आहे. तपासासाठी चार सदस्यीय पथक तयार करण्यात आलं असून जे कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा होईल असं म्हटलं.