सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम राबवली. गुरुवारी, बचाव पथकांनी तिस्ता नदीच्या पात्रात आणि उत्तर बंगालच्या खालच्या भागात शोध सुरू केला आहे. आजूबाजूला चिखल आहे, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. अद्यापही मोठ्या संख्येने लोक बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानक आलेल्या पुरात लोक वाहून गेले आहेत.
मुख्य सचिव व्हीबी पाठक यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे उत्तर सिक्कीममधील ल्होनक तलावावर ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला, त्यानंतर 22 लष्करी जवानांसह 98 लोक बेपत्ता झाले. त्याच वेळी, शेजारील राज्य पश्चिम बंगालच्या सरकारने सांगितले की, 18 मृतदेह सापडले आहेत. यातील चौघांची ओळख जवान म्हणून झाली आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. त्यांना सिक्कीममधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगन जिल्ह्यात 4, गंगटोकमध्ये 5 आणि पेक्यांग जिल्ह्यात लष्करी जवानांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसएसडीएमए) एका बुलेटिनमध्ये सांगितलं की, आतापर्यंत 2,011 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर 22,034 लोकांना आपत्तीचा फटका बसला आहे. पाठक म्हणाले की, लष्कराच्या 27 व्या माउंटन डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी उत्तर सिक्कीमच्या लाचेन, लाचुंग आणि आसपासच्या भागात अडकलेले पर्यटक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. अंदाजानुसार, सिक्कीमच्या विविध भागात परदेशींसह 3,000 हून अधिक पर्यटक अडकले आहेत.
"हेलिकॉप्टरच्या मदतीने पर्यटकांना काढताहेत बाहेर"
पाठक यांनी सांगितले की, सैन्याने आपली दूरसंचार सुविधा सक्रिय केली आणि अनेक पर्यटकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलता आले. अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढले जात आहे. त्यांना हवाई मार्गाने मंगनला नेण्याचे ठरले, तेथून त्यांना रस्त्याने सिक्कीमला आणले जाईल. हवामान चांगले राहिल्यास लाचेन आणि लाचुंगमध्ये अडकलेल्या पर्यटकांना उद्यापासून बाहेर काढण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
"खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचण"
भारतीय हवाई दल आणि लष्कराचे हेलिकॉप्टर गुरुवारी लाचेन, लाचुंग आणि चुंगथांग येथे उड्डाण करण्यासाठी सज्ज होते, परंतु खराब हवामानामुळे अडचण आली, असे ते म्हणाले.
"पुरात 11 पूल कोसळले"
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आवश्यक मदत मागितली आहे. पुरामुळे सिक्कीममध्ये 11 पूल कोसळले आहेत. मंगन जिल्ह्यात 8 पूल वाहून गेले आहेत. नामची येथील दोन आणि गंगटोकमधील एक पूल वाहून गेला आहे. चार बाधित जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या पाइपलाइन, सांडपाण्याच्या लाईन आणि माती आणि काँक्रीटची 277 घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
"बेपत्ता सैनिकांचा शोध सुरू"
बेपत्ता सैनिकांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वेगाने वाहणारी नदी बेपत्ता लोकांना उत्तर पश्चिम बंगालच्या दिशेने सखल भागात घेऊन जाण्याची शक्यता आहे. कोलकाता येथील पश्चिम बंगाल सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की 18 मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी चार जवान आणि दोन नागरिकांचे मृतदेह आहेत. या सर्वांची ओळख पटली आहे. उर्वरितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.