लखनऊ - उत्तर प्रदेशातील सितापूर जिल्ह्यात मुलींसोबत पत्नीलाही चालत्या ट्रेनमधून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. अमृतसर येथून सहरसा येथे जाणा-या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली होती. आरोपीने चार मुलींसोबत आपल्या पत्नीलाही ट्रेनमधून खाली फेकल्याने खळबळ माजली होती. घटनेला आठवडा उलटून गेला आहे, मात्र अद्यापही आरोपी रेल्वे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांचा तपास सुरु असून दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस मृत समजत होते, ती आरोपीची पत्नी जिवंत असून ती स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली.
24 ऑक्टोबर रोजी मोहम्मद इद्दू याने आपल्या मुलींसोबत जम्मू येथून ट्रेनने प्रवास सुरु केला होता. यावेळी प्रवासादरम्यान त्याने आपल्या मुली रुबिना (12), मुनिया (7), अलबून (9) आणि शमिना (4) यांना चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं होतं. त्याने असं का केलं यामागचं कारण स्पष्ट झालं नव्हतं.
महत्वाचं म्हणजे रेल्वे ट्रॅकवर पोलिसांच्या हाती दोन मृतदेह लागले होते. एक मृतदेह मोहम्मद इद्दू याच्या सात वर्षाच्या मुलीचा होता, तर दुसरा मृतदेह त्याची पत्नी आफरीन खातूनचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. मोहम्मद इद्दू याने आपल्या पत्नीचीही हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र मंगळवारी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा आफरीन खातून आपल्या दोन वर्षाच्या मुलीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. आफरीन खातून जर जिवंत आहे, तर मग आपल्या हाती लागलेला मृतदेह कोणाचा होता असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
आफरीन खातूनने पोलीस ठाण्यात हजर होत, पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला. यावेळी तिने पोलिसांना माहिती दिली की, 'धाकट्या मुलीसोबत मी झोपली असताना आपला पती मोहम्मद इद्दू यानेच मुलींना चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं. यानंतर त्याने आम्हाला तसंच सोडून दिलं आणि जम्मू काश्मीरला जाणा-या ट्रेनमध्ये चढला'
आरोपी मोहम्मद इद्दू आपल्या सावत्र मुलासोबत जम्मूमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण 29 ऑक्टोबर रोजी त्याने तेथूनही पळ काढला. कामगार म्हणून मोहम्मद इद्दू काम करतो. पोलीस त्याचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.