नवी दिल्ली : केंद्र सरकार जीएसटी भरपाईची रक्कम वेळेत देत नसल्याचे तीव्र पडसाद जीएसटी परिषदेच्या सोमवारच्या बैठकीत उमटले. केंद्राच्या सूचनेनुसार कर्ज काढण्यास भाजपची सत्ता नसलेल्या १० राज्यांनी विरोध दर्शविला आणि केंद्रानेच कर्ज काढून आमची रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी या राज्यांनी केली.केंद्र व राज्ये यांच्यात भरपाईच्या रकमेवरुन तिढा निर्माण झाल्याने परिषदेची बैठक पुन्हा १२ आॅक्टोबर रोजी होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, आज रात्रीच आम्ही सर्व राज्यांना मिळून २० हजार कोटी देत आहोत. मात्र ही रक्कम अगदीच किरकोळ असल्याची तक्रार अनेक राज्यांनी केली. कोविड १९ च्या खर्चापोटीही केंद्राने सांगितलेली पूर्ण रक्कम अद्याप दिली नसल्याची तक्रार काही राज्यांनी केली.जीएसटीची रक्कम मिळत नसल्याने केंद्राच्या सल्ल्यानुसार २१ राज्यांनी कर्ज काढण्यास अनुमती दिली आहे. ही भाजपशासित राज्ये आहेत. जीएसटी कायद्यातील तरतुदीनुसार केंद्रानेच ही रक्कम द्यावी आणि त्यासाठी वाटल्यास कर्ज काढावे, असा १० राज्यांचा आग्रह आहे. कोरोना साथीच्या काळात व्यवहार ठप्प झाल्याने जीएसटीतून पुरेसा महसूल मिळालेला नाही.
"जीएसटी भरपाईची रक्कम आम्हाला ताबडतोब द्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 1:54 AM