डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : टीव्हीवर हातवारे करून मूकबधिरांसाठी बातम्या दिल्या जातात. याच भाषेत एका मूकबधिर वकिलाने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच हे घडले आहे.
एका आभासी सुनावणीत सांकेतिक भाषा दुभाषी सौरव रॉय चौधरी यांनी मूकबधिर अधिवक्ता सारा सनी यांचा सांकेतिक युक्तिवाद कोर्टात मांडला. सारा सनी यांना सुरुवातीला यासाठी परवानगी मिळत नव्हती; पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दुभाषी न्यायालयाच्या कार्यवाहीमध्ये सामील होऊ शकतो म्हणत त्यांना परवानगी दिली. सौरव चौधरींनी सांकेतिक भाषेचा अर्थ अनपेक्षित वेगाने सांगून उपस्थितांना अवाक् केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दुभाषी ज्या वेगाने भाषेचा अर्थ सांगत आहेत ते आश्चर्यकारक आहे म्हणत त्यांचे कौतुक केले.
सांकेतिक भाषेचा वापर
अमेरिकन किंवा ब्रिटिश सांकेतिक भाषेत एकाच हाताचा वापर, तर भारतीय सांकेतिक भाषेत दोन्ही हातांचा व इशाऱ्यांचाही वापर केला जातो.
२०१५ मध्ये भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. २४ नोव्हेंबर २००१ रोजी पहिला ‘भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश’ प्रकाशित झाला.
या शब्दकोशात १२ राज्यांतील ४२ शहरांमधील २५०० हून अधिक चिन्हांचे दस्तऐवजीकरण केले आहे. याच शब्दकोशाचा वापर मूकबधिर वकील करतात.