शिंदे सरकार सत्तेत आल्यावर लगेचच एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता. वेदांता आणि फॉक्सकॉन कंपन्या एकत्र येऊन सेमीकंडक्टर प्लाँट उभारणार होत्या. परंतू, याला वर्ष होत नाही तोच फॉक्सकॉनने वेदांतासोबतची डील रद्द करत वेगळी वाट धरली आहे. एवढ्यावरच हे थांबलेले नाही तर फॉक्सकॉन आता गुजरातलाही टाटा बाय़ बाय करण्याची तयारी करत आहे.
फॉक्सकॉनचे सीईओ भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दोन दिवस दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत गुजरातची झोप उडविली आहे. Foxconn चे सीईओ ब्रांड चेंग यांनी सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याविषयी चर्चा आणि चाचपणी केली. इकडे कर्नाटकचे नेते खूश होत नाहीत तोच त्यांनी मंगळवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट घेतली आहे.
फॉक्सकॉन एकट्यानेच प्रकल्प उभारणार आहे. यासाठी 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीतून 14,000 हून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. शिवाय यामुळे मोबाईल इंडस्ट्री, ऑटो इंडस्ट्रीसमोरील मोठे संकट दूर होणार आहे. यामुळे या उद्योगांमध्येही रोजगार उपलब्ध होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी फॉक्सकॉन कोणत्या राज्यात प्रकल्प टाकण्याचा निर्णय घेते यावरून तेथील राजकाण्यांना फायदा होणार आहे.
गुजरातमध्ये सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण फॉक्सकॉनने कोणतेही कारण न देता करारातून माघार घेतली होती. आता वेदांता देखील प्रकल्प उभारणीवर ठाम राहिली आहे. यामुळे एकाचवेळी दोन प्रकल्प उभे राहतात की एखादी कंपनी माघार घेते हे देखील भविष्यात पहायला मिळणार आहे.