नवी दिल्ली - सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निर्बंध लादण्याची अमेरिकेने दिलेली धमकी आणि इतर अडथळे धुडकावून लावत भारत आणि रशियामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच दोनी देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर सह्या झाल्या आहे.
भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या भेटीमध्ये संरक्षणाबरोबरच अंतराळ सहकार्यासाठीही महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारांतर्गत भारताला सैबेरियामधील नोवन्होसिबिर्स्क शहराजवळ निरीक्षण केंद्र उभारण्याची परवानगी रशियाने दिली आहे.