नवी दिल्ली - गुजरातमध्ये भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने 80 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. गेल्या निवडणुकीशी तुलना करता भाजपाला 16 जागांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसने हा आपला नैतिक विजय असल्याचं सांगत भाजपावर हल्ला चढवला आहे. अभिनेता प्रकाश राज यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे खुलं पत्र लिहत तुम्ही खरंच जिंकलात का ? असा प्रश्न विचारला आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं पत्र शेअर केलं आहे. प्रकाश राज यांनी पत्रात काही प्रश्न विचारले आहेत. तुमच्या विकास मॉडेलचं काय झालं ? तुम्ही लोक 150+ जागा जिंकणार होतात, त्याचं काय झालं ? असे प्रश्न त्यांनी मोदींसमोर उपस्थित केले आहेत.
यावेळी प्रकाश राज यांनी काही गोष्टींवर विचार करण्याचा सल्ला नरेंद्र मोदींना दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, लोकांना विभागण्याचं राजकारण काम करत नाही. आपल्या देशात पाकिस्तान, धर्म आणि जातीपेक्षाही मोठे मुद्दे आहेत. आपल्या देशात शेतक-यांचे काही मुलभूत प्रश्न आहेत ज्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही ते बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.
हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.