ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १४ - मिरची खाल्याने 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मुलीने चुकीने मिरची खाल्ली होती त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न करुनदेखील तिला वाचवता आलं नाही. श्वासनलिका बंद पडल्याने हा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुलीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र उलटीमुळे श्वासनलिका बंद पडली ज्यामुळे तिला वाचवता आलं नाही. ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती मात्र मेडिको-लिगल या जनरलमध्ये छापून आल्याने ही घटना समोर आली आहे.
अशाप्रकारे मिरची खाल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच आणि दुर्मिळ घटना असल्याचं डॉ चित्तरंजन बेहरा यांनी सांगितलं आहे. जेव्हा एखादा पदार्थ किवा द्रव आपल्या श्वासनलिकेत अडकतो तेव्हा अशी समस्या निर्माण होते. लगेच उपचार करण्यात आले नाहीत तर श्वासनलिका बंद पडण्याची शक्यता असते अशी माहिती एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिली आहे.