नवी दिल्ली, दि. 7 - गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे शक्यतो टाळावा अशी सूचना वारंवार दिली जाते. मात्र अनेकदा वाहनचालक निर्धास्तपणे चालू गाडीच मोबाईल फोनचा वापर करताना दिसत असतात. मात्र असं करणं आपल्या जिवावर बेतू शकतं. वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनंतर ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, गतवर्षी गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर केल्याने जवळपास 2138 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय चुकीचे स्पीड ब्रेकर, रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांच्या बांधकामांमुळे दिवसाला 26 लोकांचा मृत्यू होत आहे.
अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रस्ते दुर्घटनांमध्ये होणा-या सर्वात जास्त मृत्यूमागचं मुख्य कारण मोबाइलचा वापर आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक आहे. राजधानी दिल्लीत गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एकूण 172 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्यांदाच वाहतूक मंत्रालयाने राज्यांकडून ही माहिती गोळा केली आहे.
अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की, 'वाहन चालवताना मोबाइल फोनवर गप्पा मारणे तसंच सेल्फी घेण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे बेजबाबदार वागणा-यांच्या जिवाला धोका असतोच, मात्र ते इतरांसाठीही धोका ठरु शकतात'.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने, अपघात होण्याची शक्यता चौपटीने वाढते'. 'सेव्ह लाइफ फाऊंडेशन'ने देखील यासंबंधी एक सर्व्हे केला होता. सर्व्हेमध्ये वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होते असं समोर आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्या 47 टक्के लोकांनी गाडी चालवताना मोबाइलवर फोन आल्यास आपण उत्तर देतो असं मान्य केलं होतं.
अहवालानुसार, रस्त्यांवर असणा-या चुकीच्या स्पीड ब्रेकरमुळे यावर्षी 3396 जणांचा मृत्यू झाला आहे. तर खड्ड्यांमुळे 2324 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 3878 जण रस्त्यांच्या बांधकामामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.