'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:26 AM2021-11-30T11:26:59+5:302021-11-30T11:31:16+5:30
मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह यांनी एका वर्षात 38 वाघांचा मृत्यू होणे चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे.
भोपाळ:मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) वनमंत्री कुंवर विजय शाह (Forest Minister Vijay Shah) यांचे एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. राज्यात एका वर्षात 38 वाघांचा(Tiger) मृत्यू होणे ही गंभीर बाब नसून 40 ते 45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे, असे वक्तव्य शाह यांनी केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाघांच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री शाह म्हणत आहेत की, जिथे जास्त लोकसंख्या असते, तिथे जास्त मृत्यू होतील. तुम्हाला माझे उत्तर विचित्र वाटेल. पण, साधारणत: 11-12 वर्षात वाघ मरतात, आमच्या मते राज्यात साडेसहाशे वाघ आहेत, तर भारत सरकारच्या नोंदीमध्ये 526 वाघ आहेत.
38 वाघांचा मृत्यू चिंतेचा विषय नाही
त्यांनी पुढे प्रश्न केला की, रेकॉर्डनुसार 526 वाघ आहेत आणि 11-12 वर्षात मध्ये वाघांचा मृत्यू झाला तर दरवर्षी किती वाघांचा मृत्यू झाला पाहिजे ? माझ्या मते दरवर्षी 40-45 वाघांचा मृत्यू झाला पाहिजे. जर 38 वाघांचा मृत्यू झाला असेल, तर हा आकडा आपल्यासाठी चिंतेचा विषय नाही.
स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर आकडेवारी जाहीर
वाघांच्या मृत्यूबाबत एका एनजीओने न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात वनविभागाने वाघांच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती, त्यात राज्यातील वाघांच्या गणनेची आकडेवारीही मांडण्यात आली आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.
ये है मध्यप्रदेश के वनमंत्री विजय शाह ?
— Narendra Saluja (@NarendraSaluja) November 29, 2021
इनके मुताबिक़ प्रदेश में अभी जो 38 टाइगर की मौत हुई है वो कम है,जनसंख्या के हिसाब से तो 40-45 टाइगर की मौत होना चाहिये…
ये टाइगर की उम्र 10-11 साल बता रहे है जो की कम है क्योंकि शिवराज जी तो 18 वर्ष बाद भी कहते है कि टाइगर अभी ज़िंदा है… pic.twitter.com/cIVw84HzwQ
काँग्रेसने उडवली खिल्ली
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी वनमंत्र्यांच्या या विधानावर खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'वनमंत्री कुंवर विजय शाह वाघाचे वय 10-12 वर्षे सांगत आहेत. पण, शिवराज 18 वर्षानंतरही म्हणतात, टायगर अभी जिंदा है...'