श्रीनगर/ नवी दिल्ली : उरी येथील दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या १८ बहाद्दर जवानांच्या रक्ताचा बदला घेण्याची संतप्त भावना देशभरातून व्यक्त होत असतानाच, काश्मीर खोऱ्यात आणखी दहशतवादी पेरण्याचे पाकिस्तानचे दोन प्रयत्न भारतीय लष्कराने मंगळवारी हाणून पाडले आणि तसे करताना १० घुसखोरांचा सीमेवरच खात्मा केला. कारवाईत लष्कराचा एक जवान शहीद झाला. घुसखोरांना घुसता यावे, यासाठी पाक सैनिकांनी सीमेपलीकडून केलेल्या गोळीबारासही लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी व नोगाम सेक्टरमध्ये घुसू पाहणाऱ्या १५ घुसखोरांना लष्कराने रोखले. या दोन्ही ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये १० घुसखोर ठार झाले. पळून गेलेल्या आणखी घुसखोरांचा पाठलाग करून परिसरातील जंगलात शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. श्रीनगरमधील लष्कराच्या प्रवक्त्याने घुसखोरीचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडल्याचे सांगितले. मात्र किती घुसखोर मारले गेले याचा आकडा कारवाई अद्याप कारवाई सुरू असल्याने दिला नाही. नौगाम येथील चकमकीत एक जवान शहीद झाल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. दिल्लीत मात्र लष्कराच्या प्रवक्त्याने ठार झालेल्या घुसखोरांचा १० आकडा दिला; मात्र त्यांचे मृतदेह संध्याकाळपर्यंत जंगलातून आणले गेले नव्हते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)>त्वरित कारवाई करून घुसखोरी हाणून पाडलीमंगळवारी हाणून पाडलेले घुसखोरीचे प्रयत्न उरीपासून काही अंतरावरच झाले. उरीच्या हल्लेखोरांना चोख उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिल्यानंतर लष्करानेही मुठी आवळलेल्या होत्याच.सकाळी लच्छीपुरा आणि बोनियार या प्रत्यक्ष सीमारेषेवरील गावांमध्ये सीमेपलीकडच्या पाकिस्तानी चौक्यांमधून गोळीबार सुरू झाल्यावर आधीच सज्ज असलेले लष्कर अधिक सतर्क झाले. घुसखोरीच्या नव्या प्रयत्नांकडून लक्ष विचलित करण्याची ही खेळी आहे हे ओळखून शस्त्रसंधीच्या या उल्लंघनाचा मुकाबला करीत असतानाच लष्कर परिसरावर लक्ष ठेवून होते. दोन ठिकाणी घुसखोरी होत असल्याचे दिसल्यावर त्वरित कारवाई करून ती हाणून पाडली गेली. सीमेपलीकडून केल्या गेलेल्या गोळीबारात गावांमध्ये कोणताही जीवित-वित्तहानी झाली नाही.या वर्षात पाकिस्तानने सीमेपलीकडून काश्मिरात पाठविलेल्या आणि लष्कराने यमसदनास पाठविलेल्या घुसखोर अतिरेक्यांची संख्या १२३वर पोहोचली आहे.>चार शहिदांना अश्रुपूर्ण निरोपकाश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे संदीप ठोक, साताऱ्याचे चंद्रकांत गलंडे, अमरावतीचे विकास उईके, यवतमाळचे विकास कुळमेथे या जवानांच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दहा घुसखोरांचा सीमेवरच खात्मा
By admin | Published: September 21, 2016 6:14 AM