ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १० - उल्कापातामध्ये तामिऴनाडूतील बस चालकाचा मृत्यू झाल्याचा दावा 'नासा' या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने फेटाळून लावला आहे. जमिनीवर झालेल्या स्फोटामुळे बस चालकाचा मृत्यू झाला असल्याचे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
शनिवारी वेल्लोर जिल्ह्यातील के.पंतारापल्ली गावातील इंजीनिअरिंग कॉलेजच्या आवारात एक स्फोट झाला. त्यात बसचालकाचा मृत्यू झाला. आकाशातून उल्केचा गोळा पडून हा स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला होता. स्फोटानंतर पाच फूट खोल आणि दोन फुट रुंद खड्डा पडला. पोलिसांना तिथे दगडही सापडला होता.
उल्कापातामध्ये मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्मिऴ आहे. आतापर्यंत नोंद असलेला जो वैज्ञानिक इतिहास आहे त्यामध्ये उल्कापातामध्ये मृत्यू झाल्याची कुठेही नोंद नसल्याचे नासाचे ग्रहमालेचे वैज्ञानिक लिंडले जॉन्सन यांनी अमेरिकन दैनिकाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.