कोरोनामुळे मृत्यू : अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधीस परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:05 AM2020-09-20T05:05:10+5:302020-09-20T05:05:37+5:30
संडे अँकर । मृत्यूनंतर सन्मान मिळणे हा घटनात्मक अधिकार : उच्च न्यायालय
खुशालचंद बाहेती ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे धार्मिक विधी करण्याचा अधिकार अनुच्छेद २१ (जगण्याचा अधिकार) इतकाच महत्त्वाचा आहे, असे मत कलकत्ता उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेत प्रशासनाविरुद्ध दोन तक्रारी करण्यात आल्या होत्या. पहिली तक्रार ही करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी प्रशासनातर्फे असन्मापूर्वक करण्यात येत असल्याबद्दल होती. दुसरी तक्रार अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी करू देण्यात येत नाहीत, इतकेच नव्हे तर अंत्यदर्शनही घेऊ देण्यात येत नाही, अशी होती. उच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना अत्यंदर्शन घेणे व अंत्यसंस्कारापूर्वी धार्मिक विधी हे मयताच्या नातेवाईकांचे अधिकार मान्य करीत आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करून यास परवानगी दिली.
घटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये असलेला जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सन्मानाने जगणे म्हणजे फक्त जिवंतपणी सन्मान नव्हे तर मृत्यूनंतरही सन्मान मिळणे होय. त्यामुळे अंत्यसंस्कार सन्मानानेच झाले पाहिजेत.
(मुख्य न्या. थोटाथील बी. राधाकृष्ण आणि अरिजित बॅनर्जी)
उच्च न्यायालयाचे निर्देश
1 हॉस्पिटलमधील कारवाई पूर्ण झाल्यानंतर मृत शरीर निकटच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे.
2 शरीर हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी न्यावे. मयताच्या घरीसुद्धा नेऊ नये.
3 मयतास निर्जंतुकीरण केलेल्या बॉडी बॅगमध्ये ठेवावी. ही बॅग चेहऱ्याजवळ पारदर्शक असावी.
4 मयतास हाताळणाऱ्यांनी मास्क, मोजे, पीपीई वापरावेत.
5 अंत्यसंस्कारापूर्वी चेहºयाचा भाग उघडावा. बॉडी बॅगला स्पर्श न करता सुरक्षेची साधने घालून निकटवर्तीयांना अंत्यदर्शन घेता यावे, तसेच याच वेळी-पाणी पाजणे, धान्य देणे, ग्रंथवाचन करणे आदी धार्मिक विधी दुरून करावेत.