भोपाळ : हेड कॉन्स्टेबलची हत्या केल्यानंतर सोमवारी पहाटे भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले सिमीचे (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) आठ अतिरेकी भोपाळलगत इटखेडी भागातील अचारपुरा येथे चकमकीत मारले गेले. दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन केल्याचे वृत्त धडकताच खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारला अहवाल मागितला आहे. राज्य सरकारने तडकाफडकी कारवाई करताना कारागृह अधीक्षक अखिलेश तोमर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी इटखेडी भागात दहशतवाद्यांचा छडा लावत त्यांना घेरले होते. दहशतवाद्यांनी गोळीबार करीत आव्हान दिल्याने पोलिसांनी गोळीबार केला. चकमकीत आठही अतिरेकी मारले गेल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. दहशतवादी पळून गेल्याची माहिती मिळताच मध्य प्रदेश सरकारने दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीनंतर या सर्वांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत.गेल्या तीन वर्षांत सिमीच्या दहशतवाद्यांनी कारागृहातून पलायन करण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. २०१३ मध्ये मध्य प्रदेशच्याच खंडवा कारागृहातून सिमीचे सात दहशतवादी पळून गेले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने तुरुंग फोडण्याच्या या घटनेबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. कारागृह प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचा हलगर्जीपणा झाला काय, हे तपासण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, हे जाणून घेण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. आठ दहशतवाद्यांच्या पलायन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. आठ अतिरेकी चकमकीत मारले गेल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पत्रकारांना त्याबाबत माहिती दिली. मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना दूरध्वनीवर माहिती दिली आहे. अतिरेक्यांचे तार देशातच नव्हे तर विदेशातही जुळलेले असावेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ मध्य प्रदेशचे राहिले नाही. एनआयएकडे तपास सोपविल्याने या घटनेमागचे तथ्य उघड होईल, असे त्यांनी नमूद केले. या घटनेचे गांभीर्य पाहता राज्य सरकारने माजी पोलीस महासंचालक नंदन दुबे यांच्याकडून तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे पाऊलही उचलले जाऊ शकते, असे ते म्हणाले. चौहान यांनी स्वत: सक्रिय होत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. पाच अधिकाऱ्यांना निलंबित करतानाच चौहान यांनी अतिरिक्त कारागृह अधीक्षकांची पोलीस मुख्यालयी तडकाफडकी बदली केली. (प्रतिनिधी)>दहशतवाद्यांवर देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंदचकमकीत मारल्या गेलेल्या आठ दहशतवाद्यांपैकी पाच जण काही वर्षांपूर्वी खंडवा कारागृहातून फरार झाले होते. अकील, जाकीर, मेहबूब, अमजद आणि मोहम्मद सादिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या घडामोडीचे केंद्र खंडवा होते. या सर्वांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी खंडवा कारागृहातून पलायन केले होते. या दहशतवाद्यांवर खंडवा येथे एटीएस जवान सीताराम आणि दोन लोकांची हत्या तसेच रतलाम येथे एटीएस जवानाची हत्या, देशद्रोह, बँकेत दरोडा, लूटमार यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद होती. त्यांच्यावर खंडवासह विविध न्यायालयात गंभीर प्रकरणे दाखल आहेत. खंडवा कारागृहात सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचे नऊ सदस्य होते. त्यापैकी सहा फरार झाले होते. त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. >पहाडामागे दडले होते अतिरेकी...अतिरेकी गुनगा पोलीसठाण्यांतर्गत अचारपुरा जंगलालगत खेजडा गावी पहाडावर दडून बसले होते. अतिरेक्यांना शरण येण्यास सांगितल्यानंतर त्यांनी गोळीबार केला. पोलिसांवर दगडफेकही केली, असे पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी यांनी सांगितले. अतिरेकी पळून गेल्यानंतर नऊ तासानंतर ही चकमक झाली. भोपाळ पोलीस, गुन्हे शाखा आणि एसटीएफचे ११ जवान या मोहिमेत सहभागी होते, असे ते म्हणाले. इंदूरहून गृहमंत्रालयाला मिळालेल्या गुप्तचर अहवालात सिमीचे अतिरेकी पळून जाण्याची शक्यता वर्तविली होती, अशी माहिती अनधिकृत सूत्रांनी दिली आहे.>सिमीच्या संशयित अतिरेक्यांनी कसे केले ‘जेल ब्रेक’!घटनेची वेळ : सोमवारी पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान बी ब्लॉकमध्ये असलेले सिमीचे आठ संशयित अतिरेकी फरार झाले.अतिरेक्यांनी आधी बरॅक तोडले. त्यानंतर स्टीलच्या धारदार प्लेटने हेड कॉन्स्टेबल रमाशंकर यांची गळा कापून हत्या करण्यात आली. दुसरा सुरक्षारक्षक चंदन याला बांधून ठेवले.सर्व अतिरेकी कारागृहाच्या भिंतीपर्यंत पोहोचले. बेडशीट एकमेकांना बांधून सर्वांनी कारागृहाची भिंत चढून पोबारा केला. सुरक्षा रक्षकांच्या ड्युटी अदलाबदलीदरम्यान अतिरेक्यांनी ‘जेल ब्रेक’ केले.
सिमीच्या आठ अतिरेक्यांचा खात्मा
By admin | Published: November 01, 2016 5:37 AM