लखनऊ : डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये सापडल्यानंतर आता त्या राज्यात कोरोनाच्या कप्पा विषाणूने बाधित एका रुग्णाचे निधन झाले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील वैद्यकीय यंत्रणा अत्यंत सतर्क झाली आहे.कप्पा विषाणूच्या संसर्गाने मरण पावलेल्या रुग्णाचे वय ६६ वर्षे असून ही घटना संत कबीरनगर येथे घडली. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख अमरेश सिंह यांनी सांगितले की, या रुग्णाला कोरोना झाल्याचे २७ मे रोजी केलेल्या चाचणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला १२ जून रोजी बीआरडी महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जिनोम सिक्वेन्सिंगच्या निष्कर्षातून १३ जूनला असे आढळले की, या रुग्णाला कप्पा विषाणूची बाधा झाली आहे. या रुग्णाने उत्तर प्रदेशच्या बाहेर कुठेही प्रवास केलेला नव्हता.
केरळमध्ये झिका विषाणूचे १४ रुग्णकेरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील वैद्यकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. हा विषाणू डासाच्या माध्यमातून माणसांमध्ये संक्रमित होतो. केरळमध्ये या विषाणूची लागण सर्वप्रथम एका गर्भवती महिलेला झाली. त्यानंतर असे अजून १३ रुग्ण त्या राज्यात सापडले. या विषाणूच्या संसर्गाची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. त्यात रुग्णाला ताप येतो, सांधे दुखतात.
उत्तर प्रदेशमध्ये याआधी डेल्टा प्लस विषाणूची बाधा झालेले २ रुग्ण आढळले होते. त्यातील एक रुग्ण गोरखपूर व दुसरा रुग्ण देवरिया जिल्ह्यात सापडला होता.