नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या मृत्यूमागे कुठलेही कारस्थान वा घातपात नाही़ रस्ता अपघातातात जखमी झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे़सीबीआयने सर्व दिशेने तपास केला़ संशयित लोकांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कारवाया तसेच मुंडे यांच्याशी संबंधित सर्वांची चौकशी केली गेली़ तपासाअंती त्यांचा मृत्यू अपघाती मृत्यू होता, असे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे़ दिल्लीत ३ जुलैला मुंडे यांच्या कारला धडक देणाऱ्या वाहनाचा चालक गुरविंदर सिंह याच्या पार्श्वभूमीतूनही काहीही संशयास्पद आढळले नाही़ मात्र अपघाताशी संबंधित त्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे़मुंडे यांच्या मृत्यूनंतर १५ दिवसांनी सीबीआयने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघातीच
By admin | Published: October 08, 2014 4:21 AM