नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. तसेच आपलेही परके झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.
एका महिलेला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला नाही. महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही. त्यामुळे शेवटी एकट्या मुलीनेच पीपीई किट घालून आपल्या आईचे अंत्यविधी पूर्ण केले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे श्राद्ध किंवा जेवणाच्या कार्यक्रमावेळी मात्र तब्बल दीडशेहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याची माहिती आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकटी मुलगी आपल्या आईचे अंत्यविधी करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यावेळी तिला कोणीच मदत केली नाही.
मुलीने एकटीनेच सर्व काही केलं. मात्र त्यानंतर असलेल्या जेवणासाठी 150 लोकांनी हजेरी लावली. मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे केलेल्या एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता या मुलीला बरेच कष्ट करावं लागत आहे. पडेल ते काम करावे लागत आहे. बिहारमधील एका गावात ही घटना घडली आहे. या गावातील वीरेन मेहता यांच्या कुटुंबाला कोरोनामुळं बरंच काही गमवावं लागलं. ते स्वतः डॉक्टर म्हणून गावात काम करायचे. रुग्णांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली. चार दिवसांच्या अंतरात दुर्दैवानं या दोघांचाही मृत्यू झाला.
गावचे सरपंच सरोज कुमार मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पंधरा दिवसांत गावातील दोन डॉक्टरांसह चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या मृत्यूनंतर जेवणाच्या कार्यक्रमावेळी दीडशेहून अधिक लोक आले होते. त्यांची मोठी मुलगी सोनी लहान भाऊ बहीण नितीश आणि चांदणीची काळजी घेत असते. गावात कोरोनामुळे सध्या खूपच बिकट स्थिती आहे. गावात 200 लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.