भोपाळ : बसची धडक लागून गंभीर जखमी झालेला एक युवक वेळेवर मदत न मिळाल्याने मध्य प्रदेश विधानसभेच्या जवळच रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. हा युवक जखमी अवस्थेत तडफडत असताना तेथे हजर असलेले पोलीस मात्र मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या ताफ्याची व्यवस्था पाहण्यातच मग्न राहिले. गंभीर जखमी स्थितीत पडून राहिलेल्या युवकाला मदत न करता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे लक्ष देणाऱ्या या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.मंगळवारी राज्य विधानसभा भवनाजवळच २२ वर्षीय विकास सोनिया या युवकाला बसने धडक दिली. त्यात विकास गंभीर जखमी झाला. तो वेदनेने तडफडत राहिला पण त्याला मदत करण्यासाठी कुणीही धावून आले नाही. विकास गंभीर जखमी झाल्याचे जवळच असलेल्या पोलिसांनीही पाहिले, पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याची व्यवस्था करण्याला प्राधान्य देत त्यांनी विकासकडे दुर्लक्ष केले. काही काळानंतर विकासला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.‘तात्काळ मदत व उपचारा’अभावी युवकाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत काँग्रेसने विधानभवनासमोर तैनात असलेल्या पोलिसांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला सलामी देण्यास प्राधान्य दिले आणि विकास अर्धा तासपर्यंत घटनास्थळी पडून राहिला, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी म्हटले आहे.
वेळीच मदत न मिळाल्याने जखमी युवकाचा मृत्यू
By admin | Published: March 04, 2016 2:34 AM