चंद्रकांत दडस
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रस्ते गुळगुळीत असोत, ऐसपैस असोत की सहापदरी असोत. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास अपघात ठरलेला आहे, हे गेल्या १७ वर्षांतील आकडेवारीतून समोर येते. २००५ ते २०२१ या १७ वर्षांमध्ये देशात रस्ते अपघातात तब्बल २३ लाखजणांचा बळी गेला असून, ८१ लाख ७० हजारांपेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
वाढत्या लोकसंख्येनुसार अपघातांची संख्या दरवर्षी काही प्रमाणात कमी-अधिक होत असली तरी हे प्रमाण २१.६ टक्क्यांवरून वाढून ३७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रस्ते अधिक चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला. मात्र, हाच वेग अपघाताचे मोठे कारण ठरत असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर येते.
वाहनांची संख्या झाली प्रचंड
१९७० मध्ये प्रति किमी वाहनांची संख्या केवळ १.२ होती. त्यामध्ये दरवर्षी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. २००० मध्ये हे प्रति १ किमीवर १४.७ वाहने रस्त्यावर होती. २०१० मध्ये हेच प्रमाण २७.९ वर पोहोचले होते. २०१० नंतरही वाहन संख्येत मोठी वाढ झाली आहे.
रस्ते सुधारले, मृत्यू वाढले...
१९७० ते २०१० पर्यंत प्रत्येक वर्षी रस्ते अपघातांमध्ये वाढ होत होती. २०१० मध्ये ही वाढ सर्वाधिक होती. मात्र, रस्ते वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेल्याने २०१० नंतर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी कमी होत गेले आहे. मात्र, त्याचवेळी २०१० पासून रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण मात्र वाढले आहे.
असे वाढत गेले मृत्यू
वर्ष अपघात मृत्यू जखमी१९७० ११४ १५ ७० १९८० १५३ २४ १०९ १९९० २८३ ५४ २४४ २००० ३९१ ७९ ३९९ २०१० ५०० १३५ ५२८ २०२० ३६६ १३१ ३४८(एक किलोमीटर अंतरात झालेले अपघात)
काय सांगते आकडेवारी
एकूण अपघात -- जखमी -- मृत्यू
- २००५ -- ४,३९,२५५ -- ४,६५,२८२ -- ९४,९६८
- २००८ -- ४,८४,७०४ -- ५,२३,१९३ -- १,१९,८६०
- २०१० -- ४,९९,६२८ -- ५,२७,५१२ -- १,३४,५१३
- २०१४ -- ४,८९,४०० -- ४,९३,४७४ -- १,३९,६७१
- २०१८ -- ४,६७,०४४ -- ४,६९,४१८ -- १,५१,४१७