ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 20 - उत्तराखंडच्या रामनगरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दहशत पसरवणा-या वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. अनेक जणांचा या वाघिणीने जीव घेतला होता तर अनेकांना जबर जखमी केलं होतं.
या वाघिणीचा वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने खात्मा केला. यासाठी 45 दिवसांपासून मोहीम हाती घेण्यात आली होती. जवळपास 75 लाख रूपये या मोहिमेत खर्च झाले. तिच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचाही वापर करण्यात आला.
गुरूवारी सकाळी ही वाघिण दिल्लीपासून 250 किमी दूर रामनगरमध्ये दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली त्यानंतर वाघिणीला घेरण्यात आलं. वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक शिका-यांनी वाघिण दिसताच 11 गोळ्यांच्या फैरी झाडून वाघिणीला मारलं.
या वाघिणीच्या दहशतीने लहान मुलं शाळेत जाण्यासही घाबरत होती. वनविभागाने या वाघिणीला नरभक्षक घोषीत केलं होतं. वाघिणीच्या मृत्यूनंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वाघिणीला मारण्यासाठी आतापर्यंत चालवण्यात आलेलं हे सर्वात मोठं आणि खर्चिक ऑपरेशन होतं असं सांगितलं जात आहे.