इंदूरचे फॅशन व्यावसायिक अभिषेक गुप्ता याचं वयाच्या 30 व्या वर्षी कार्डियक अरेस्टने निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेकच्या मृत्यूच्या 12 दिवस आधीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि मे महिन्यात लग्न होणार होते. ज्या घरात सर्वजण लग्नाची जोरदार तयारी करत होते, त्या घरात नवरदेवाच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच डॉक्टरही हैराण झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातही एकच खळबळ उडाली आहे.
30 वर्षीय अभिषेक गुप्ता फॅशन व्यवसायाशी संबंधित होता. रतलाम येथील एका फॅशन डिझायनरशी त्याचं लग्न होणार होतं. 22 जानेवारीला साखरपुडा झाला आणि 2 मे रोजी लग्न होणार होतं. अभिषेकची मृत्यूच्या दिवशीही जीवनशैली रोजच्यासारखीच होती. एंगेजमेंटनंतर अभिषेक स्वतः लग्नाच्या तयारीत व्यस्त होता. 4 फेब्रुवारीलाही तो सकाळी 11 वाजता गीता भवन येथील फॅशन अँड रेडीमेड दुकानात गेला. त्यानंतर थोड्यावेळाने तो आपल्या घरी आला. त्याने आईला मोठ्या आवाजात हाक मारली आणि खूप जास्त भीती वाटत असल्याचं सांगितलं.
"अस्वस्थता कमी होत नव्हती"
अभिषेकने आईला मला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असंही सांगितलं. कुटुंबीय त्याला तातडीने उपाचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जेव्हा डॉक्टरांनी पहिला ईसीजी केला तेव्हा त्यांनी सर्व काही नॉर्मल असल्याचे सांगितले, पण त्याची अस्वस्थता कमी होत नव्हती. अशा परिस्थितीत त्याला तातडीने आयसीयूमध्ये नेण्यात आले आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्याची भीती वाढतच होती. दोन तीन ईसीजी केले, पण काही कळले नाही. अखेर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले.
कुटुंबीयांसह डॉक्टरांनाही बसला धक्का
अभिषेकची प्रकृती त्यानंतर अधिकच बिघडली. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, पण नंतर डॉक्टरांनी अभिषेक नो मोर... असं म्हणत त्याच्या मृत्यूची माहिती दिली. तासाभरात प्रकृती खालावल्याने अभिषेकचं निधन झाले. या घटनेने कुटुंबीयांसह डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या अल्मोडा जिल्ह्यातील गावातही अशीच एक घटना घडली आहे. एका डॉक्टरच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली. लग्न मंडपात सप्तपदी सुरू असताना एका डॉक्टरचा अचानक मृत्यू झाला.
बापरे! सप्तपदी घेत असतानाच नवरदेव खाली कोसळला; 30 वर्षीय डॉक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू
डॉक्टरांच्या छातीत अचानक दुखू लागले आणि चक्कर आल्याने तो खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समीर उपाध्याय असं या डॉक्टरचं नाव असून तो मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट होता. शुक्रवारी त्याच्या लग्नाची वरात निघाली. सप्तपदी घेण्यापूर्वी समीर उपाध्याय याची प्रकृती ठीक होती. मात्र, अचानक त्या़च्या छातीत दुखू लागले. डॉक्टर वराच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरचं वय 30 वर्ष होते. डॉ. समीरच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"