नवी दिल्ली : रशियाच्या लष्करात भरती झालेले ६९ भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. भारतीयांची दिशाभूल करून त्यांना रशियन लष्करात भरती केल्याची बाब तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गंभीर मुद्यासंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली.
रशियन लष्करातील भारतीय नागरिकांची भरती व दक्षिण पूर्व आशियातील नागरिकांच्या सायबर गुन्हे तस्करीचा मुद्दा केंद्र सरकारने गांभीर्याने घेतल्याचे लोकसभेतील पूरक प्रश्नाचे उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले. रशियन लष्करात एकूण ९१ भारतीय नागरिक भरती झाल्याची माहिती आहे.
पैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी चौघांचे मृतदेह भारतात पाठवण्यात आले. यासोबत १४ भारतीयांना सुटी मिळाली असून ते मायदेशी परतले आहेत. मात्र. आखणी ६९ भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
रोजगार नसल्यामुळे...रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे रशियन सैन्यात अनेक भारतीय नागरिक जात आहेत. तरुणांना दुसऱ्या देशासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही घटना राष्ट्रीय शोकांतिका असल्याचे म्हटले आहे.
रशियाने जाहीर केली आणीबाणीकिव्ह : युक्रेनकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्यानंतर रशियाने कुर्स्क प्रदेशात आणीबाणी घोषित केली आणि शुक्रवारी तेथे कुमक पाठवली.
युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या भूमीवर किव्हचा हा सर्वांत मोठा हल्ला आहे. दरम्यान, रशियाच्या विमानाने प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्राने युक्रेनच्या शॉपिंग मॉलवर धडक दिली, ज्यात किमान ११ जण ठार झाले, तर ४४ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.