उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील सहस्त्र ताल ट्रेकिंग मार्गावर खराब हवामानामुळे 22 जणांचा गट अडकला होता. त्यांना वाचवण्यासाठी 4 जून रोजी बचावकार्य सुरू करण्यात आले. 36 तास चाललेल्या या बचावकार्यात 13 जणांना वाचवण्यात आले, तर 9 ट्रॅकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचावकार्याच्या सुरुवातीपासूनच राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जिल्हा प्रशासनाकडून अपडेट्स घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक ट्रेकिंग असोसिएशनची 22 सदस्यीय ट्रेकिंग टीम 29 मे रोजी उत्तरकाशीच्या सिल्ला गावातून सहस्त्रतालला रवाना झाली होती. या टीमने 29 मे ते 7 जून या कालावधीसाठी पर्यटन आणि वन विभागाची परवानगी घेतली होती. 4 जून रोजी जोरदार वादळ आणि पावसामुळे त्यांचा रस्ता चुकला आणि ते कुफरी टॉपमध्ये अडकले. ट्रेकिंग टीमच्या सदस्यांनी मंगळवारी संध्याकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला माहिती दिली. माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी उशिरा बचावकार्य सुरू करण्यात आले. हे बचावकार्य 36 तास चालले. राज्य पोलीस, वनविभाग, एसडीआरएफ आणि हवाई दलाच्या मदतीने हे बचावकार्य पूर्ण करण्यात आले.
सुदेवाने 22 पैकी 13 जणांचा जीव वाचला, तर 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह रुग्णालयात पाठवले. बचाव कार्यादरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने अपडेट्स घेत होते. दरम्यान, एका जखमी ट्रेकरने सांगितले की, 4 जून रोजी त्यांचा ग्रुप परतत होता, यावेळी भीषण बर्फवृष्टी झाली. अचानक ताशी 90 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले, त्यामुळे संपूर्ण ग्रुप तिथेच अडकला.
ट्रेक जितका सुंदर, तितकाच अवघडसहस्त्र ताल ट्रेक हा उत्तराखंडच्या गढवाल प्रदेशात असलेला एक लोकप्रिय ट्रेक आहे. येथील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. आजकाल ट्रेकर्स आणि पर्यटक या ठिकाणी ट्रेकला येत असतात. सुमारे 15 हजार फूट उंचीवर असलेला सहस्त्र ताल ट्रेक ऋषिकेशपासून सुरू होतो अन् 130 किमी कामड गावात संपतो. ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारणत: 7-8 दिवस लागतात. या ट्रेकमध्ये अनेक हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे, हिरवीगार कुरण आणि घनदाट जंगल आहे. हा ट्रेक जितका सुंदर आहे, तितकाच कठीणदेखील आहे.