भोपाळ : दक्षिण आफ्रिकेहून भारतात आणलेल्या व मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या चित्त्यांपैकी उदय या चित्त्याचा रविवारी मृत्यू झाला. त्याचे वय सहा वर्षांचे होते. गेल्या महिनाभरात या राष्ट्रीय उद्यानात दोन चित्ते मरण पावले आहेत.
नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांपैकी साशा चित्त्याचे गेल्या २७ मार्च रोजी किडनी विकाराने निधन झाले होते. उदय हा चित्ता रविवारी गलितगात्र अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र उदयचा रविवारी संध्याकाळी ४ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी दिली. विदेशातून चित्ते आणताना त्यांना आवश्यक असलेले पर्यावरण, परिसराचा भारताने बारकाईने अभ्यास केला नव्हता, अशी टीका आफ्रिकेतील वन्यजीवतज्ज्ञांनी केली हाेती.