बंगळुरू - विमान प्रवासात प्रवाशाच्या झालेल्या गैरसोयीबद्दल ग्राहक न्यायालयाने कंपनी आणि विमानतळ प्रशासनला चांगलंच फटकारलं आहे. तसेच, प्रवाशी ग्राहकाच्या बाजुने निर्णय देताना पीडित कुटुंबीयास १२ लाख रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत. या प्रवासात ६० वर्षीय प्रवाशाचा ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला होता. बंगळुरूतील केपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली होती. त्यावेळी, इंडिगो विमानसेवा आणि केआयएकडून वेळेत आणि आवश्यस सुविधा न मिळाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला होता. त्यासंदर्भात, त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती.
चंद्रा शेट्टी हे त्यांची पत्नी सुमती आणि मुलगी दीक्षिता यांच्यासमवेत १९ नोव्हेंबर २०२१ रोजी मंगळुरूला जात होते. त्यावेळी, बंगळुरूच्या केपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानातून ते प्रवास करणार होते. मात्र, विमानतळावर चेक इन करताच चंद्रा शेट्टींना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यावेळी, त्यांच्या पत्नी आणि मुलीने संबंधित विमानतळ व इंडिगो कंपनीच्या स्टाफकडे मदतीसाठी याचना केली. तसेच, तात्काळ व्हील चेअर मिळावी, ज्यातून त्यांना रुग्णालयात दाखल करता येईल, अशी मागणीही केली. मात्र, कंपनी स्टाफ यांनी वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे, चंद्रा शेट्टींना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला व त्यामध्ये त्यांचे निधन झाले.
यासंदर्भात सुमती आणि दीक्षिता शेट्टी यांनी प्रथम केपगौडा विमानतळावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, तिथे दखल न घेतल्यामुळे मार्च २०२२ मध्ये त्यांनी बंगळुरूच्या ग्रामीण ग्राहक न्यायलयात धाव घेतली. येथे इंडिगो कंपनीचे वकील आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. तसेच, ग्राहकांना आवश्यक ती सुविधा आणि अत्यावश्यक सेवा देणं ही कंपनीची जबाबदारी असून ती टाळता येणार नाही, असे नमूद केले. त्यानुसार, पीडित कुटंबीयांस नुकसान भरपाई म्हणून १२ लाख रुपयो मोबदला देण्याचे निर्देशही ग्राहक न्यायालयाने कंपनी व विमानतळ अथॉरिटीला दिले.