झाशी - अहमदाबादहून अयोध्येला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांना तब्बल १३ तास मृतदेह घेऊन प्रवास करावा लागला. १३ तासांनंतर ट्रेन झाशी रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर डब्यातून मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर जीआरपीने मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली. यावेळी मृतकाची पत्नी मृतदेहासोबत बसून राहिली.
मृत व्यक्ती पत्नी, लहान मुले आणि एका सहकाऱ्यासोबत सुरतहून अयोध्येला जात होते. या प्रवासादरम्यान त्याला ट्रेनमध्येच झोप लागली. मात्र अनेक तास उलटूनही तो न उठल्याने शेजारी बसलेल्या लोकांना संशय आला. त्याला हलवल्यावर त्या व्यक्तीचा श्वास थांबल्याचे दिसून आले. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या बोगीत स्लीपर कोचच्या सीट क्रमांक ४३, ४४, ४५ वर रामकुमार पत्नी, दोन मुले आणि साथीदार सुरेश यादव यांच्यासह प्रवास करत होते. रामकुमार हा अयोध्येतील इनायत नगर येथील मजलाई गावचा रहिवासी होता. ते सगळे सुरतहून अयोध्येला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले होते. प्रवास करताना रामकुमारला रात्री झोप लागली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरेश यांनी रामकुमार यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठले नाहीत. त्यांना हलवल्यावर कळालं की रामकुमार यांच्या हृदयाची धडधड ती थांबली होती.
सुरेशने सांगितले की, रामकुमारची पत्नी आणि मुले त्यांच्यासोबत होती. त्यामुळे मी प्रवासादरम्यान त्यांना काहीही सांगितले नाही. कारण ट्रेनमध्ये गोंधळ झाला असता. रामकुमारच्या मृत्यूची त्यांना कोणतीही माहिती नव्हती. रात्री ८.३० वाजता ट्रेन झाशीच्या वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा जीआरपीच्या मदतीने रामकुमारचा मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढण्यात आला. जिथे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृत व्यक्तीच्या पत्नीनं काय म्हटलं?
मी जेव्हा ८ वाजला उठले तेव्हा पतीला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही बोलत नव्हते. त्यांचे शरीर गरम झाले होते. काहीही कळत नव्हते. आम्ही त्यांना खूप उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती असं मृतकाच्या पत्नीने सांगितले. दरम्यान, रामकुमार आजारी होता. सूरतमध्ये तो गाडी चालवायचा. त्याचा अपघात झाला होता. अनेकांकडे उपचारासाठी आम्ही गेलो परंतु ते ठीक झाले नाहीत. त्यामुळे आम्ही फैजाबादला त्यांना घेऊन चाललो होतो. रस्त्यात आम्ही एकमेकांशी गप्पा मारत होतो. त्यानंतर आम्ही झोपी गेलो. त्यांचा मृत्यू कधी झाला हे माहिती नाही असं सुरेश यांनी म्हटलं.